सिंधुदुर्ग - जिल्हा कोरोनामुक्त असताना मुंबईसारख्या कोरोनाच्या 'हॉटस्पॉट' असलेल्या ठिकाणावरून येऊन खासदार विनायक राऊत हे जिल्ह्यात ठिक-ठिकाणी भेटी देत आहेत. त्यांच्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती असून त्यांना क्वारंटाईन करा, अशी मागणी मनसे नेते, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.
खासदार विनायक राऊत यांच्या मतदारसंघातील दौऱ्यावर सध्या अनेक नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. आज मनसे नेते, माजी आमदार परशुराम उपरकर यांनीही त्यांना क्वारंटाइन करण्याची मागणी केली आहे. विनायक राऊत कार्यकर्त्यांचा लवाजमा, व पंधरावीस गाड्यांचा ताफा घेऊन फिरत आहेत. त्यामुळे जिल्हा वासियांसाठी एक न्याय आणि खासदारासाठी वेगळा न्याय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे, असेही उपरकर म्हणाले.
खरे म्हणजे खासदारांनी पाच दिवस होम क्वारंटाईन होण्याची गरज होती. मात्र, खासदार बिनधास्तपणे जिल्ह्यात फिरत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना भीती वाटायला लागली आहे की, खासदारामुळेच जिल्ह्यात कोरोना पसरेल. त्यामुळे जिल्ह्याच्या जनतेने जी शिस्त पाळली ती आता का पाळावी, असा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे खासदारांनीच क्वारंटाईन होण्याची गरज असल्याचे मत मनसेचे नेते माजी आमदार परशुराम उपरकर यांनी व्यक्त केले आहे.