सिंधुदुर्ग - लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांच्याबद्दल परत अश्लील शब्द वापराल तर शिवसैनिकच निलेश राणेंना फटकावतील. खासदार विनायक राऊत हे शिवसेनेचे सचिव व आमचे नेते आहेत. यापुढे जर असे आरोप त्यांच्यावर झाले तर जशास तसे उत्तर दिले जाईल. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शांततेचे वातावरण बिघडले तर याची सर्वस्वी जबाबदारी निलेश राणेंना प्रदेश सचिव केलेल्या भाजप पक्षाची राहील. याची नोंद भाजप पक्षाने घ्यावी.असा इशारा शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.
देशातील उकृष्ठ कामगिरी करणाऱ्या खासदारांच्या यादीमध्ये विनायक राऊत -
आमदार वैभव नाईक पुढे म्हणाले, खासदार विनायक राऊत यांना २ वेळा जनतेने मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे. निलेश राणेंना त्यांनी २ वेळा धूळ चारली. खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून मोठं मोठी विकास कामे सिंधुदुर्ग जिल्हयात होत आहेत.गेले अनेक वर्षे रखडलेला चिपी विमानतळ प्रकल्प पूर्ण होत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारले जात आहे. घोटगे सोनवडे घाट रस्ता, तसेच रस्ते, ब्रिज, वीज ,पाणी, या सुविधा त्यांच्या माध्यमातून मतदारसंघात पुरविण्यात येत आहेत. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या समस्या ते सोडवित आहेत. सहज उपलब्ध होणारे खासदार म्हणून त्यांची ओळख आहे. देशातील उकृष्ठ कामगिरी करणाऱ्या खासदारांच्या यादीमध्ये त्यांचा समावेश आहे. मतदारसंघातील प्रश्न ते तडफदारपणे लोकसभेत मांडत आहेत.
निलेश राणे सिंधुदुर्गात दहशत माजविण्याचा प्रयत्न करत आहेत -
केवळ प्रसिद्धीसाठी निलेश राणे त्यांच्यावर आरोप करून सिंधुदुर्गात दहशत माजविण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन वेळा झालेल्या पराभवामुळे निलेश राणे यांच्यात कुठली हिंमत अथवा कुवत राहिलेली नाही. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त आहेत. असे आमदार वैभव नाईक म्हणाले आहेत.
काय म्हणाले होते निलेश राणे -
खासदार राऊत यांनी नारायण राणे आणि फडणवीसांवर केलेल्या टिकेला प्रत्युत्तर देताना निलेश राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर जहरी टीकास्त्र सोडले आहे. विनायक राऊत यांनी स्वत:ची भाषा न बदलल्यास जिथे दिसेल तिथे फटके लावणार असल्याचा इशारा देखील निलेश राणे यांनी दिला आहे. या संदर्भाचा एक व्हिडिओ त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
हिंमत असेल तर राजीनामा द्यावा -
निलेश राणे व्हिडिओच्या माध्यमातून बोलताना म्हणाले की, ''विनायक राऊत हे सामाजिक कार्यावर बोलणार नाहीत, त्यांनी नारायण राणे, फडणवीस यांच्यावर टीका केली. मुळात ते मातोश्री़चे चप्पल चोर आहेत. स्वत: मोदी लाटेत निवडणून आले. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी राजीनामा देऊन आता निवडणुकीला सामोरे जावे. आणि निवडून येतात का ते पाहावे, पण ती हिंमत ते दाखवणार नाहीत'''विनायक राऊत म्हणजे मातोश्रीचे थापा आहेत. ते स्वत: नॉन मॅट्रीक आहेत. संसदेत काय बोलतात त्यांचे त्यांना समजत नाही, वैयक्तीक आयुष्यातही त्यांचे गुण चांगले नाहीत'' खासदारकीचा एकही गुण नाही, अशीही टीका निलेश राणे यांनी एकेरी भाषेचा वापर करत केली आहे.
२०२४ ला खासदार राऊत यांना कोकणातून हद्दपार करणार -
तसेच २०२४ च्या निवडणुकीत विनायक राऊत यांचा कायमचा बंदोबस्त करणार,त्यांना कोकणातून हद्दपार करणार असल्याचे आव्हान देतानाच, निलेश राणे यांनी विनायक राऊत यांना भाषा बदलली नाही तर, ''जिकडे दिसशील तिकडे फटके देईन'', असा धमकीवजा इशाराही दिला आहे.