सिंधुदुर्ग - कोकणात कार्तिक पौर्णिमेपासून सुरू होणाऱ्या वार्षिक जत्रोत्सवाला दशावतारी नाट्य प्रयोग कोविड बाबतचे शासनाचे नियम व अटींचे पालन करून सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी. अशी मागणी शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांची मुंबई येथे भेट घेऊन केली आहे. यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर, दशावतारी मंडळांचे प्रतिनिधी म्हणून अखिल दशावतारी पारंपारिक लोककला अकादमी सिंधुदुर्गचे अध्यक्ष, बाळकृष्ण गोरे दशावतारी मंडळाचे मालक दिनेश गोरे उपस्थित होते.
कोकणातील दशावतार ही लोककला सुमारे ५०० वर्षांपासूनची असून कोविड काळात ही पारंपारिक लोककला बंद असल्याने कलाकारांवर व मंडळांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाचे नियम पाळून दशावतारी नाट्यप्रयोग सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी. तसेच दशावतारी मंडळांना शासनामार्फत आर्थिक पाठबळ देऊन न्याय देण्याची मागणी आमदार वैभव नाईक व दिनेश गोरे यांनी केली. तसेच दशावतारी नाट्य मंडळ व दशावतारी कलाकारांच्या विविध अडचणी समस्यांकडे वैभव नाईक यांनी लक्ष वेधले. यावेळी अमित देशमुख यांनी सकारात्मक चर्चा करत दशावतारी लोककलेला व कलाकारांना न्याय देण्याची ग्वाही दिली आहे.