सिंधुदुर्ग - ठाकरे सरकारने पत्रकारांच्या लसीकरणासाठी सिंधुदुर्ग पॅटर्नचा बोध घ्यावा, असा सल्ला भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पत्रकार लसीकरण पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबवावा असेही त्यांनी म्हटले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा हा आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जिल्हा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारतेला संपूर्ण जगतात एक वेगळे महत्त्व आहे. त्यामुळे आमच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत व उपाध्यक्ष राजन म्हापसेकर यांच्यासह सर्व सदस्यांनी आपली प्रबळ इच्छाशक्ती दाखवत संपूर्ण राज्याला आदर्श दाखवून दिला आहे. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर पत्रकारांना कालपासून लसीकरण सिंधुदुर्गात सुरु झाले आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने पत्रकारांच्या लसीकरणाबाबत बोध घ्यावा. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पत्रकार लसीकरण पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबवावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी सरकारकडे केली आहे.
१५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन प्रदान
दरम्यान आमदार नितेश राणे यांनी उपजिल्हा रुग्णालयाला १५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि वैद्यकीय साहित्य सुपूर्द केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे यांच्यासह पंचायत समिती सदस्य कणकवली नगरसेवक व भाजप पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत यांनी नियोजन करत येथील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेतले. हाच पॅटर्न राज्यातही राबवला जाऊ शकतो. मात्र त्यासाठी राज्य सरकारची मानसिकता असायला हवी, असल्याचे ते म्हणाले.