सिंधुदुर्ग - नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पासंबंधित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका फार महत्त्वाची आहे. मुख्यमंत्र्यांनी या अगोदर सांगितले माझा विकासाला विरोध नाही. परंतु, स्थानिक जनतेला विश्वासात घेतले पाहिजे. स्थानिकांचा विरोध नसेल तर चांगले उद्योग आले पाहिजेत, अशा मताचे मुख्यमंत्री आहेत. नाणार ग्रीन रिफायनरी आल्यास कोकणातील आंब्याच्या बागांवर परिणाम होणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे. ग्रीन रिफायनरीमुळे परिणाम होणार की नाही याबाबत आवश्यक ते संशोधन होऊन ते मुख्यमंत्र्यांपर्यत पोहोचले पाहिजे, असे मत जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. राज ठाकरे यांच्या मुख्यमंत्र्यांना प्रकल्पाच्या समर्थनार्थ दिलेल्या पत्रानंतर ते बोलत होते.
स्थानिकांच्या मतासोबत शिवसेना नेहमीच राहते
मुख्यमंत्री यातून मार्ग काढू शकतात. स्थानिकांचे जे मत असते त्या मतासोबत शिवसेना नेहमीच राहते. हा प्रकल्प झाला पाहिजे असे वाटत असल्यास या प्रकल्पाचा पर्यावरणावर कोणताही परिणाम होणार नाही, बागायतीवर कोणता परिणाम या प्रकल्पामुळे होणार नाही हे सिद्ध व्हायला लागेल. जर कुणाला वाटत असेल हा प्रकल्प झाला पाहिजे तर त्यांनी स्थानिकांना समजावले पाहिजे. ग्रीन रिफायनरी हा पेट्रोलियमचा प्रकल्प असल्यामुळे स्थानिकांचा विरोध आहे. या प्रकल्पामुळे कोकणातील रोजगाराचा प्रश्न हा प्रकल्प आल्यास निश्चित सुटू शकतो, असेही केसरकर म्हणाले.
काय आहे राज ठाकरे यांच्या पत्रात
कोरोनोत्तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर रत्नागिरी राजापूर रिफायनरीसारखा प्रकल्प हातातून गमावणे ना कोकणाला परवडेल, ना महाराष्ट्राला. राज्याचे दीर्घकालीन हीत लक्षात घेऊन या प्रकल्पाच्या बाबतीत सरकारने सामंज्यस्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन करणारे पत्र महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे.