सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना जिल्हा रुग्णालयामार्फत कोरोना रुग्णांबाबत दिल्या जाणाऱ्या आकडेवारीमध्ये गेल्या काही दिवसांपासून गोंधळ सुरू आहे. सोमवारी देण्यात आलेल्या माहितीमध्ये तर अकरा रुग्ण गायब झाल्याचे दिसून आले.
कोरोनाचे संकट ओढवल्यापासून कोरोनाची माहिती रोजच्या रोज जिल्हा रुग्णालयाकडून माहिती कार्यालयामार्फत दिली जात आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या माहितीमध्ये वारंवार विसंगती दिसून येत आहे. जिल्हा रुग्णालयाकडून अधिकृत अहवाल जाहीर होण्याअगोदरच तालुका आरोग्य कार्यालयाकडून कोरोना रुग्णांची माहिती बाहेर पडत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची नेमकी आकडेवारी किती, याबाबत नागरिकांमधून शंका व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ४९२ रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर सायंकाळी आणखी नऊ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ५०१ झाली. त्यानंतर रविवारी रात्री उशिरा आणखी १५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५१६ झाली. परंतु सोमवारी जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या माहितीमध्ये एकूण रुग्ण ५०५ एवढेच पॉझिटिव्ह दाखविले गेले. त्यामुळे ५१६ एकूण रुग्ण संख्या झाली असताना अकरा रुग्ण कमी दाखविले गेल्याचे उघड झाले.
कणकवली तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता. तसेच कणकवली मधील नागरिकांना कोविड टेस्टसाठी दूरवर जावे लागू नये यासाठी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर यांनी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत व आमदार वैभव नाईक यांच्याकडे कणकवलीत कोविड रॅपिड अँटीजेन टेस्ट सेंटर सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पालकमंत्री सामंत यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी खलिफे यांच्याशी संपर्क साधून रॅपिड टेस्ट किट व टेक्निशियन उपलब्ध करून कणकवलीत अँटीजेन टेस्ट सेंटर सुरू करण्याची सूचना केली होती. त्याप्रमाणे कणकवलीमध्ये आजपासून रॅपिड अँटीजेन टेस्ट सेंटर सुरू करण्यात येत आहे.
कणकवली तालुक्यात कोरोनाचा होणार फैलाव पाहता कोविड रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची, तसेच मुंबई व इतर भागातून आलेल्या व्यक्तींना कोरोनाची लक्षणे आढळत असल्यास त्यांची कोविड १९ टेस्ट या रॅपिड अँटीजेन टेस्ट किटद्वारे केली जाणार आहे. अर्ध्या तासात याचा रिपोर्ट मिळणार आहे.