सिंधुदुर्ग - आम्ही दोन दिवसाचे तरी अधिवेशन घेतले, आपण केंद्रात काय केलात? आम्हाला पळपुटे म्हणता, मग अधिवेशन न घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काय म्हणावे? असा प्रश्न विचारत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भाजपवर निशाणा साधला. महाविकास आघाडी सरकारने यंदा केवळ दोनच दिवसांचे अधिवेशनाचे आयोजन केल्याने विरोधी पक्ष भाजपाकडून टीका करण्यात आली होती. त्या अनुषंगाने मंत्री सामंत यांनी भाजपाचा समाचार घेतला. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शेतकरी आंदोलनामुळे यांना रस्त्यावरून सुद्धा जाता येत नाही-
यावेळी मंत्री सामंत पुढे म्हणाले, महाराष्ट्रात आम्ही 2 दिवसाचे तरी अधिवेशन घेतले, मात्र केंद्र सरकारने काय केले? शेतकरी आंदोलनामुळे यांना रस्त्यावरून सुद्धा जाता येत नाही. त्यामुळे यांना विमानाने किंवा हेलिकॉप्टरने जावे लागते आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्यावर ही परिस्थिती आणली आहे. आम्ही 2 दिवस अधिवेशन घेतले म्हणून राज्यात भाजपच्या नेत्यांनी आम्हाला पळपुटे संबोधले, मग मोदींनी अधिवेशन रद्द का केले याचे उत्तर अगोदर द्या? असेही ते म्हणाले. तर तुम्ही आम्हाला पळपुटे म्हणता, मग आम्ही मोदींना असे म्हटलं तर चालेल का? शेवटी त्यांचा हुद्दा कुठे आणि यांचा कुठे, असा टोला उदय सामंत यांनी लगावला.
आम्ही दोन दिवसांचे तरी अधिवेशन घेतले, ग्रामपंचायत निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत कोणती रणनीती आखण्यात आली आहे हे सांगणार नाही. मात्र, तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीच्या बैठकीत एकत्र लढण्याचा निर्णय झाला आहे, असेही सामंत यांनील यावेळी नमूद केले आहे.
चिपी विमानतळ उद्दघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते -चिपी विमानतळाचे उर्वरित काम २६ जानेवारीपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या विमानतळाच्या उद्दघाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येतील असेही मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. नारायण राणे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन 2014 पर्यंत चिपी विमानतळ आपण बांधून पूर्ण केल्याचा दावा करत ते सुरू करण्याची जबाबदारी माझीच असल्याचं म्हटले होते. यावर बोलताना उदय सामंत म्हणाले, नारायण राणेंनी केले तर मग आनंद आहे. या पलीकडे काय बोलू? आनंदचं आहे. मात्र विरोधाला विरोध आपण करणार नाही. मीच केलंय म्हणून सांगणार नाही. केंद्राने चिपी संदर्भात कोणतंही आडमूठं धोरण घेतलेलं नाही. ज्या ज्या वेळी केंद्रात चिपी संदर्भात मिंटीग लावली जाते, तेव्हा खासदारांचा मान सन्मान ठेवून मिटींग घेतली जाते. त्यामुळे केंद्र सरकारने चिपी विमानतळाविषयी कोणताही नकारात्मक विचार केलेला नाही, असा दावाही उदय सामंत यांनी केला आहे.
सगळ्या शाळा चालू करण्यासाठी शासनाचा आग्रह नाही- ग्रामीण भागात आजही एसटी सेवा सुरू नाही, त्यामुळे बरेच विद्यार्थी शाळेपर्यंत पोहोचू शकत नाहीत. याबाबत मंत्री उदय सामंत याना विचारले असता, ते म्हणाले की सगळ्याच शाळा सुरु कराव्यात, असा शासनाचा आग्रह नाही. मात्र ज्या ठिकाणी कनेक्टिव्हीटी कशी आहे. याचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांना घ्यायला सांगितले आहे. त्याप्रमाणे शक्य असेल तशा शाळा सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.