मुंबई - देशातील वेगवेगळ्या भागातून गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कोणत्याही स्वरुपाचा विरोध नाही. त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास प्रशासन कटिबद्ध असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी स्थानिक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सामंत म्हणाले, गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना विलगीकरण कक्षात (कॉरंटाईन ) चौदा दिवस ठेवण्यापेक्षा सात दिवस ठेवणे, त्यांना कोकणात गणेशोत्सवासाठी येताना टोल माफ सुविधा देणे, त्यांच्या पासची व्यवस्था आणि प्रवासाचे नियोजन, तसेच त्यांची कोविड-19 ची तपासणी करणे आणि त्याचा खर्च शासनाने करावा, अशा विविध विषयांवर सविस्तर बैठकीत चर्चा करण्यात आली.
कोकणात येणाऱ्या सर्व चाकरमान्यांची विशेष काळजी घेण्यात येईल. चाकरमान्यांनी गणपतीला आलेच पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. त्यांना कोकणात येण्यास विरोध नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.