सिंधुदुर्ग - जिल्ह्यात पर्यटनला चालना मिळण्यासाठी संधी आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने पर्यटन विकास ( Tourism Development ) करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे ( Tourism Minister Aditya Thackeray ) यांनी सांगितले आहे. मालवण येथे जेटीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. पर्यटन विकास आणि संवर्धनासाठी अनेक गोष्टी सुरू आहेत, असेही ते म्हणाले. तर विरोध नसलेल्या जागेत नानार प्रकल्प ( Nanar Project ) करणार असल्याचेही मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
स्थानिक भूमीपुत्रांना विश्वासात घेऊन ग्रीन रिफायनरी प्रकल्प आणणार. जिथे लोकांचा विरोध नसेल तिथेच प्रकल्प येणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. आमदारांना मोफत घर मिळण्याबाबत विचारले असता ही घर मोफत नसून योग्य त्या दरात केवळ मुंबई बाहेर राहणाऱ्या आमदारांना मिळणार आहे, असेही ठाकरे यांनी सांगितले.
मालवण नगरपरिषद क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या मत्स्यालय व जैवविविधता माहिती केंद्राचे सादरीकरण मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी केले. यानंतर आदित्य ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले, मत्स्यालयाचा प्रस्ताव असून अनेक हॉटेलांचे देखील प्रस्ताव येत आहेत. लागणाऱ्या परवान्यांची संख्या ही ८० वरुन १० वर आणली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले हे केवळ किल्ले नसून ती मंदिरे आहेत. पर्यटन आणि त्यांचे संवर्धन अशा दोन्हींबाबत काम सुरु आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - चंद्रपुरातील पाणी पुरवठा सुरू करा, अन्यथा मनपाला कुलुप ठोकू; आमदार किशोर जोरगेवार यांचा इशारा