सिंधुदुर्ग - सावंतवाडी तालुक्यातील डेगवे-फणसवाडी येथील युवा उद्योजक योगेश देसाई यांनी कर्ज घेऊन गावातच मशरूम शेती प्रकल्प सुरू केला. मशरूमला गोव्यात मोठी मागणी असल्याने सुरुवातीच्या काळात या व्यवसायात त्यांनी जम बसवला. मात्र कोरोनाच्या संकटामुळे राज्यांच्या सीमा बंद झाल्याने कित्येक किलो तयार मशरूम जाग्यावरच कुजून गेली. संपूर्ण व्यवसायच ठप्प झाल्याने या प्रकल्पासाठी घेतलेले कर्जाचे हप्ते फेडायचे कसे ? असा प्रश्न आता त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. मशरूम प्रकल्प हा शेतीचा भाग असल्याने शासनाने आर्थिक मदतीचा हात द्यावा, अशी त्यांची मागणी आहे.
अॅटोमोबाइल इंजिनिअर असलेले योगेश देसाई यांना मुंबई, पुणे येथे नोकरीच्या देखील संधी मिळाल्या होत्या. काही वर्षे त्यांनी मुंबईत नोकरी देखील केली. मात्र नोकरीच्या मागे न पळता आपला स्वतःचा काहीतरी व्यवसाय करावा, असा विचार त्यांच्या डोक्यात आला. या विचारानेच त्यांनी 5 वर्षांपूर्वी मुंबई सोडून गाव गाठले. इतरांहून वेगळा काहीतरी व्यवसाय करण्याच्या उद्देशाने त्यांनी स्थानिक बाजारपेठ, व्यवसायाची प्रगती यावर अभ्यास केला. सिंधुदुर्ग जिल्हा हा कृषिप्रधान असल्याने शेतीपूरक व्यवसाय म्हणून त्यांनी मशरूम शेती प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला. फ्लोरिडा मशरूम नावाने त्यांनी आपला उद्योग सुरू केला.
स्थानिक वित्तीय संस्थेकडून त्यांनी अर्थसहाय्य घेऊन व्यवसायास प्रारंभ केला. अल्पावधीतच प्रगती देखील साधली. लगतच्या गोवा राज्यात हॉटेलमध्ये मशरूमची मागणी असल्याने त्यांनी या व्यवसायात पूर्णपणे लक्ष केंद्रित केले. सिंधुदुर्ग-गोवा सीमा गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असल्याने योगेश देसाई यांना आपले मशरूमचे उत्पादन थांबवावे लागले आहे. आता त्यांनी मशरूमच्या बेडपासून गांडूळ खत बनवायला सुरवात केली आहे. यावेळी देसाई यांनी जिल्ह्याच्या सध्यस्थितीची माहिती दिली.
जिल्ह्यात मशरूम शेतीचे 10 प्रकल्प आहेत. त्यात सरासरी महिन्याकाठी एकूण 3 ते 3.5 टन मशरुमचे उत्पादन घेण्यात येते. महिन्याची एकूणच अंदाजे उलाढाल 10 ते 15 लाखांच्या आसपास होते. स्थानिक बाजारपेठेत देखील मशरूमला मागणी आहे. आपल्यासारखेच जिल्ह्यातील अन्य उद्योजक हे बी. टेक, एम. टेक झालेले उच्चशिक्षित तरुण आहेत, असे देसाई म्हणाले. सध्या लॉकडाऊन असल्याने सर्व टुरिझम हॉटेल, मॉल बंद आहेत. त्यामुळे मशरूमचा व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय नाही, असेही देसाई म्हणाले.