सिंधुदुर्ग - रविवारी दिवसभरात कोकण रेल्वे मार्गावर खास गणेशोत्सव स्पेशल रत्नागिरी व सिंधुदुर्गात चार गाड्या दाखल झाल्या. मात्र, त्यातून अवघे २२६ चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले. पहिल्याच दिवशी गर्दी होणार अशी अपेक्षा असताना चाकरमान्यांनी रेल्वेमार्गे कोकणात येण्यास पसंती दर्शवली नाही. परिणामी रेल्वेला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले.
कोकणात सध्या ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर असलेले विलगीकरणाचे नियम, त्यातच गावपातळीवर तयार करण्यात आलेली नियमावली व या सगळ्या पार्श्वभूमीवर कोकणात आधीच चाकरमानी दाखल झाल्याने रेल्वेला प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र, सुरुवातीला प्रवासी कमी असले तरी येत्या दोन-तीन दिवसात किती चाकरमानी कोकणात येतील, यावरच पुढील प्रतिसाद कळणार आहे. आठ दिवसांपूर्वी रेल्वे वाहतूक सुरू केली असती तर मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल झाले असते. गाड्या सोडण्यास उशिर झाल्याची भावना चाकरमान्यांमध्ये आहे. रेल्वे प्रशासनाने १५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत रेल्वेच्या एकूण १६२ फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर केले. रेल्वेतून मोठ्या संख्येने चाकरमानी येतील, अशी अपेक्षा होती. मात्र, पहिल्याच दिवशी आलेल्या चार गाड्यातून दोन्ही जिह्यात मिळून केवळ २२६ प्रवासी दाखल झाले. त्यात काही गोव्यात जाणारे होते तर, काही कोल्हापूर जिह्यात जाणारे होते.
दरवर्षी गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी कोकणात येतात. त्यामुळे रेल्वे कमी पडत असत. मुंबईहून सुटलेल्या दोन गाड्या सावंतवाडी रेल्वेस्थानकावर सकाळी दाखल झाल्या. या दोन्ही गाड्यातून मिळून २४ प्रवासी सावंतवाडीत उतरले. या दोन्ही गाड्या पुन्हा मुंबईच्या दिशेने गेल्या असून त्यातून ३० प्रवासी मुंबईकडे गेले. मोठ्या प्रमाणात प्रवासी येतील, त्यांची तपासणी करता यावी, यासाठी सिंधुदुर्गप्रशासनाच्या वतीने आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन व महसूल विभागाचे कर्मचारी रेल्वे स्थानकावर तैनात होते. त्यात दोन आरोग्य पथके होती. प्रवाशांची आवश्यक तपासणी करून त्यांना पाठविण्यात येत होते. तर, त्यांच्या सोईसाठी एसटी बस ठेवण्यात आली होती. मात्र, नियोजनाप्रमाणे प्रवासी आले नाहीत. आरोग्य विभागाची दोन पथके तैनात असून प्रत्येकाची थर्मल गनने टेस्ट करून हमीपत्रानुसार सोडण्यात येत आहे. दरम्यान पहिल्याच दिवशी केवळ २२६ प्रवासी आल्याने रेल्वेला नुकसान सोसावे लागले. आहे. त्यातच कोकण रेल्वेमार्गावर वेस्टर्न रेल्वेच्या सहकार्यातून गणपती स्पेशलच्या आणखी २० नव्या गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. तर आणखी तीन गणपती स्पेशल नव्या गाड्यांची घोषणाही करण्यात आली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी कमी प्रवासी आल्याने येत्या दोन-तीन दिवसात किती प्रवासी येतील, यावरच रेल्वेचा प्रतिसाद कळणार आहे.
नेमकी कारणे काय आहेत -
आठ दिवसांपूर्वी कोकण रेल्वे मार्गावरील पेडणे स्थानकानजीक मालपे-खाजणे बोगद्यात दरड कोसळली. त्यामुळे रेल्वे वाहतूक बंद झाली. त्यानंतर राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यासाठी खास गणेश चतुर्थी स्पेशल गाड्या सोडण्याचे ठरविण्यात आले. मात्र, दोन्ही जिह्यात असलेली ‘कोरोना’ची सद्यस्थिती पाहता रेल्वे सोडण्याआधी आढावा घेणे गरजेचे होते. मात्र, या सगळ्यात काही दिवस चर्चेत गेले. तर, राज्य शासनाने विलगीकरण कालावधी दहा दिवस केल्याने गणेशोत्सवाआधी दहा-बारा दिवस गावी येणे गरजेचे होते. त्यामुळे मिळेल त्या वाहनातून चाकरमानी कोकणात दाखल झाले. ‘कोरोना’मुळे ती संख्या दरवर्षीसारखी नव्हती. त्यातच कोकणात येण्यासाठी जर कोण इच्छुक असेल तर त्याने ‘कोरोना’ चाचणी करून यावे. त्यात ती निगेटिव्ह असली तरच घरी जाता येईल. तसेच तीन दिवस होम क्वारंटाईनचा नियम शासनाच्यावतीने करण्यात आला. तर काही गावात १४ दिवस क्वारंटाईनचा नियम बंधनकारक करण्यात आला. त्याचा फटका रेल्वेला बसला. दरम्यान या रेल्वेची घोषणा आधीच केली असती तर चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागला नसता, अशी भावना अनेक चाकरमान्यांनी व्यक्त केली.