सिंधुदुर्ग - कोकणात अनेक वेगवेगळ्या रूढी परंपरा आहेत. जिल्ह्यातील मालवण वायंगणी गावात दर ३ वर्षांनी देवपळण होते. पहाटेच्या वेळी गुप्ततेने मानकरी आणि सेवेकरांच्या उपस्थितीत ग्रामदैवतेचे प्रतिक असलेले श्रीफळ गावच्या वेशीबाहेर नियोजित स्थळी पोहोचते. ढोलचा गजर होतो आणि कौल मिळाल्यावर वायंगणी गावच्या देवपळणीस सुरुवात होते. सोमवारपासून वायंगणी येथील त्रैवार्षिक गावपळणीला सुरुवात झाली. तीन दिवस, तीन रात्रींसाठी वायंगणी ग्रामस्थ, देव तसेच गुराढोरांसह वेशीबाहेर रानमाळ्यावर निसर्गाच्या सान्निध्यात गेले आहेत.
गावच्या ग्रामदैवताला कौल लावून देवाने दिलेल्या आदेशानुसार संपूर्ण गाव काही दिवसांसाठी निर्मनुष्य केला जातो. या प्रथेला गावपळण म्हणून ओळखले जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण वायंगणी, आचरा, चिंदर, देवगड येथील मुणगे, वैभववाडीमध्ये शिराळे या गावांमध्ये ‘गावपळण’ ची प्रथा आजही पाळली जाते.
ही गावपळण साधारणत: देव दिवाळीनंतर, महाशिवरात्र किंवाशिमगोत्सव दरम्यान साजरी केली जाते. गावकरी त्यांच्या ग्रामदैवताचा कौल घेऊन गावपळणीचा दिवस निश्चित करतात. निर्धारीत कालावधीनंतर पुन्हा देवाचा कौल घेऊन गावात परतात. या काळात गावातील सर्व माणसे गुरे-ढोरे, कुत्रे-मांजर, कोंबड्या व पाळीव पक्षी यांच्यासह तीन दिवस पुरेल इतके सामान सोबत घेऊन जातात. ग्रामस्थ कौल मिळाल्यानंतर जागा पक्की करण्यासाठी शेजारच्या गावात, नदीकिनारी अथवा वेशीवरच्या माळरानावर जाऊन झोपडी उभारतात. गावपळणाच्या काळात संपूर्ण गावात नेहमीच्या वर्दळीच्या जागी स्मशान शांतता असते. ग्रामस्थांना या दरम्यान ओस पडलेल्या आपल्या घरा-दाराची काळजी नसते. प्रत्येकाचे कुटुंब गावाबाहेर स्वतंत्र झापाच्या झोपडीत किंवा कावनात तात्पुरता संसार थाटून दैनंदिन जीवन जगते.
काही काळ निसर्गाच्या कुशीत, आभाळाच्या छायेत, स्वच्छंदी वातावरणात नेहमीच्या जीवनापेक्षा वेगळा अनुभव घेत असतानाच सामाजिक, धार्मिक सलोखा राखण्याचे महत्त्वाचे कार्यही ‘गावपळणी’च्या माध्यमातून होत असते. गावपळणीची परंपरा सुरु होण्यामागे विविध दंतकथाही सांगितल्या जातात. त्यात नैसर्गिक आपत्ती, वाईट शक्तींचा वावर किंवा सतीच्या शापांची पूर्तता असे अनेक संदर्भ येतात. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्रात प्रथा परंपरा जपत असताना त्याला अंधश्रेद्धेचा विळखा पडू दिला जाऊ नये एवढेच.