सिंधुदुर्ग - कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांमध्ये आलेल्या महापुरामुळे स्थानिक पूरग्रस्तांचे पूनर्वसन करणे गरजेचे आहे, असे खासदार नारायण राणे यांनी म्हटले आहे. याचबरोबर विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्याची मागणीही त्यांनी केली. यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. आता पूरग्रस्तांच्या पाठिशी उभे राहण्याची गरज आहे, तर सरकारने परिस्थितीचा आढावा घेऊन ही परिस्थिती हाताळण्यासाठी वेळ लागणार असेल, तर निवडणुका पुढे ढकलाव्यात, असे खासदार नारायण राणे यांनी सांगितले. ते पडवे येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यासोबतच कोकणातील भातशेतीच्या झालेल्या नुकसानाची योग्य भरपाई न मिळाल्यास महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आंदोलन करणार असल्याचा इशाराही नारायण राणेंनी यावेळी दिला.
राणे पुन्हा निवडणूक लढवणार की नाही याबाबत राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा आहेत. यावर राणे यांना विचारले असता अजून तसा निर्णय घेतलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढे पक्षहिताच्या दृष्टीने निर्णय घेतला जाईल, असे सांगत आपल्या उमेदवारी बाबतची गुप्तता त्यांनी कायम ठेवली. तसेच 15 दिवसांत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची पुढील वाटचाल तसेच पक्ष महाराष्ट्रात किती जागा लढवणार याचा निर्णय घेतला जाईल, असे राणे यांनी सांगितले.
कोल्हापुरातील महापूर परिस्थिती हाताळण्यात पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासन पूर्ण अपयशी ठरले. त्यांच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा समन्वय दिसला नाही. असा आरोपही त्यांनी केला. तर मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन कशी मदत मिळणार आहे, याची माहिती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बुधवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कोकणातील पूर परिस्थितीचीही माहिती देणार असल्याचे राणे यांनी सांगितले.