सिंधुदुर्ग - वैभववाडी तालुक्यातील भक्ती पाटील या महिलेचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. या प्रकरणी तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे. तर, तिची सासू अजूनही फरार आहे. आरोपी भरत पाटील याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
भक्ती पाटील या महिलेचा पाच वर्षांपूर्वी वैभववाडी येथील भरत पाटील याच्याशी विवाह झाला होता. भरत हा माध्यमिक शाळेत शिक्षक आहे. लग्न झाल्यापासून भरत आणि त्याची आई वनिता हे भक्तीचा मानसिक आणि शारिरीक छळ करत होते. या जाचाला कंटाळून ती १ एप्रिलला माहेरी निघून गेली. पण, गावातील ज्येष्ठ मंडळींनी मध्यस्थी केल्यावर ती सासरी परतली.
१० एप्रीलला भक्तीचा भाऊ सुरज तळेकर यांनी तिला फोन केला. तेव्हा भरत पाटील याने ती स्वयंपाक करताना भाजली गेली आहे, असे सांगितले. तेव्हा भक्तीच्या माहेरच्यांनी पाटील कुटुंबावर भक्तीला पेटवून दिल्याचा आरोप केला. पण, स्वयपाक करत असताना रॉकेलची बाटली अंगावर पडल्याने आग लागली. त्यामुळे भाजले, असा जबाब भक्तीने रुग्णालयात नोंदवला होता.
पंधरा दिवस उपचार केल्यानंतरही तिचा मृत्यू झाला. भक्तीला दोन लहान मुले आहेत. भक्तीने अपघाताने जळाल्याचे सांगितले असले तरी सासरचे लोक जाच देत होते असे जबाबात म्हटले आहे. त्यामुळे पोलिसांनी पती, सासू यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. बुधवारी आरोपी भरत पाटील याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे करत आहेत.