सिंधुदुर्ग- सिंधुदुर्गात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. कणकवलीत महामार्गाच्या धोकादायक भिंतीजवळ सर्व्हिस मार्गाच्या भिंतीला भगदाड पडले आहे. त्यामुळे ठिकाणी मार्ग वाहतुकीला धोकादायक झाला आहे. जिल्ह्यात 7 जुलैपर्यंत अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी वर्तविला आहे. तरी जिल्ह्यातील जनतेने याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
कणकवलीत फ्लायओव्हर ब्रिजचे काम सुरू आहे. या ब्रिजच्या भिंतीला आधीच तडे गेले आहेत. या भिंतीचे सिमेंट ब्लॉक केव्हाही कोसळतील अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता या भिंती शेजारीच सर्व्हिस मार्गाच्या संरक्षण भिंतीला मोठे भगदाड पडले आहे. यामुळे या ठिकाणी महामार्ग वाहतुकीला धोकादायक बनला आहे. गेले २४ तास जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. कणकवलीतील जाणवली आणि गड या दोन्ही नद्यांना मोठा पूर आला आहे. पुराच्या पाण्यासोबत गड नदीतून वाहून आलेली वडाच्या झाडाची दोन मोठी खोड कणकवली बिजलीनगर बंधाऱ्यावर अडकली आहेत.
जोरदार पावसामुळे वेंगुर्ले तालुक्यातील महादेव राजचंद्र कामत यांच्या घरावर झाड कोसळून घराची भिंत पडली. कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील आंबेरी पुलावर आणि कणकवली तालुक्यातील पिसेकामते व बिडवाडी फाट्याजवळ मोठ्या प्रमाणात नदीला पुराचे पाणी आल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील नदी काठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.