सिंधुदुर्ग - ‘तौत्के’ चक्रीवादळाची पाहणी करणाऱ्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांना देवगड बंदर येथील मच्छीमारांच्या रोषाला सामोरे जावे लागले. संतप्त झालेल्या मच्छिमारांनी पालकमंत्र्यांना खडे बोल सुनावत चांगलेच फैलावर घेतले. "जेव्हा आमचे लोक पाण्यात बुडत होते तेव्हा तुमची यंत्रणा काय करत होती, तेव्हा मदतीला धावले असता तर आज मच्छीमारांचे जीव वाचले असते. आता पाहणी कसली करता”, अशा शब्दात मच्छिमारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान, यानंतर देवगड तहसीलदार कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत मृत खलाशांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत मिळवून देणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
पालकमंत्री बंदर भागाची पाहणी करतांना उपस्थित मच्छिमार संतापले
‘तौत्के’ चक्रीवादळाची पाहणी दौरा आज (दि. 19 मे) पालकमंत्री उदय सामंत यांनी देवगड तालुक्यात केला. यावेळी बंदर भागाची पाहणी करतांना उपस्थित मच्छिमार संतापले. चक्रीवादळ येणार होते हे माहीत असतांना आपत्कालीन परिस्थितीचे काहीही नियोजन नव्हते. जेव्हा आम्हाला मदतीची गरज होती तेव्हा कोणतीच यंत्रणा सज्ज नव्हती, मच्छिमार वाहून गेले तेव्हा जिल्हा पोलीस अधीक्षकांना संपर्क साधल्यानंतर कोस्टल खात्याची मदत मिळाली हीच मदत पूर्व नियोजित सज्ज असती तर दोन लोकांचा बुडून मृत्यू झाला नसता. तर वादळात दोघे बेपत्ता झाले नसते, अशा शब्दात मच्छीमारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मृत खलाशांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत मिळवून देणार
यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी देवगड तहसीलदार कार्यालयात देवगड तालुक्याचा आढावा घेत असताना चक्रीवादळात ज्या खलाशांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांना शासन स्तरावर तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी पाठपुरावा करणार आणि त्यांना आर्थिक मदत मिळवून देणार असल्याचे सांगितले. आनंदवाडी बंदर येथे आपत्कालीन यंत्रणा तसेच तहसील कार्यालय, देवगडच्या आवारात आपत्कालीन कक्ष येत्या 15 दिवसात सुरू करण्यात यावा. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद जिल्हा नियोजन समितीमधून करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री सामंत यांनी दिले.
हेही वाचा - दोन दिवसात मुख्यमंत्री सिंधुदुर्ग दौऱ्यावर - पालकमंत्री उदय सामंत