पणजी - तौक्ते चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात फटका गोव्याला बसला आहे. चक्रीवादळामुळे गोव्यात सुमारे 40 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना मदत देण्याची सूचना प्रशासनाला करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी आज नुकसानग्रस्त भागांची पाहाणी केली, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान राज्यात येत्या 24 मे ला सकाळी 7 वाजता कर्फ्यूची मुदत संपत आहे, त्यापूर्वी शनिवारी कोरोनाच्या स्थितीसंदर्भात आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
बार्देश तालुक्यात 135 घरांचे नुकसान
चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका हा बार्देश तालुक्याला बसला आहे. तालुक्यात सुमारे 135 घरांचे नुकसान झाले आहे. तसेच वीजपुरवठा देखील खंडीत झाला आहे. उद्यापर्यंत वीजपुरवठा सुरळीत होण्याचा अंदाज आहे. दरम्यान या चक्रीवादळामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांनी अर्ज केल्यानंतर त्यांना तातडीने आपत्ती व्यवस्थापन निधीतून मदत देण्यात यावी, अशा सूचना उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
700 विजेचे खांब व 200 ट्रान्सफॉर्मरचे नुकसान
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज उच्च अधिकाऱ्यांसोबत ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीमध्ये चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. चक्रीवादळामुळे विद्युत विभागाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तब्बल 700 विजेचे खांब खाली पडले असून, 200 ट्रान्सफॉर्मरचे नुकसान झाले आहे. दरम्यान नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. विजेचे खांब पडल्यामुळे अनेक ठिकाणाचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. तो सूरळीत करण्यात येत आहे. विशेषकरून ज्या भागात रुग्णालये आणि औषध कंपन्या आहेत अशा भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे, अशी माहिती प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
पर्वरी परिसरात 36 तास वीजपुरवठा खंडित
दरम्यान पर्वरी परिसरात 36 तास वीजपुरवठा खंडित झाला होता. वीज नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. पर्वरी परिसर हा 'कॉस्मोपॉलिटन सिटीत’ मोडत असल्याने अनेक नागरिकांची या भागात ये-जा असते. वीजपुरवठा खंडीत झाल्याने या भागात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
हेही वाचा - डोअर टू डोअर लसीकरणासंदर्भात महापालिकेला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश