पणजी - गोवा आणि कर्नाटक राज्यामध्ये म्हादई पाणी वाटपावरून वाद सुरू आहे. यावर गोव्यासाठी हे पाणी का आवश्यक आहे आणि सरकार यासाठी काय करत आहे? यावर गुरुवारी गोवा विधानसभा अधिवेशनात चर्चा झाली. त्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सरकार कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही, आणि गरज भासल्यास सर्वपक्षीय शिष्टमंडळासोबत पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचे सभागृहात सांगितले होते.
प्रश्न सोडवण्यासाठी सर्व स्थरावर प्रयत्न
त्यावर आज प्रतिक्रिया विचारली असता डॉ. सावंत म्हणाले, गरज भासल्यास सर्वपक्षीय शिष्टमंडळासह पंतप्रधानांची भेट घेणार असे म्हटले आहे. परंतु, तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी होण्याची वाट बघत आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न करत असून, त्याला यश येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सरकारी संस्थेने खाऱ्या पाण्याच्या पातळीचा अभ्यास करून अहवाल दिला आहे. आम्ही ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केली ते पाहता आम्ही यशस्वी होण्याचा विश्वास आहे. तर यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना गोवा प्रदेश भाजपाचे अध्यक्ष सदानंद तानवडे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी सभागृहात जे आश्वासन दिले आहे. तिच पक्षाची भूमिका आहे. शिवाय संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पक्ष मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत आहे.