सिंधुदुर्ग - आता कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या सिंधुदुर्गातील घोटगे घाटमार्गाच्या कामासाठी बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी बैठक घेतली होती. यावेळी आशियाई बँक सहाय्य योजनेतून निधी सिंधुदुर्गातील मठ-कुडाळ-घोटगे-सोनवडे- शिवडाव गारगोटी घाट मार्गच्या 11.87 किमी लांबीच्या रस्त्याच्या कामासाठी आशियाई विकास बँकेच्या सहाय्य योजनेतून निधी देण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.
घोटगे-सोनवडे- शिवडाव राज्य मार्गाच्या कामासंदर्भात अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, आमदार प्रकाश आबीटकर हे उपस्थित होते. तसेच खासदार संजय मंडलिक व आमदार वैभव नाईक यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत सहभाग घेतला. कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडणारा 94 किमी लांबीचा हा मार्ग असून त्यातील 11.87 किमी लांबीचा मार्ग हा घाटरस्ता म्हणून प्रस्तावित आहे. या रस्त्याच्या कामासाठी निधी द्यावा, अशी मागणी खासदार विनायक राऊत, आमदार प्रकाश आबीटकर, राजन साळवी व वैभव नाईक यांनी अशोक चव्हाण यांच्याकडे केली.
घाट मार्गाच्या 11.87 किमी रस्ता तयार करण्यासाठी सर्व पर्यावरण व वन्यजीव विषयक परवाने मिळाले आहेत. या कामासाठी आशियाई विकास बँक सहाय्यित योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामधून निधीची तरतूद करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश अशोक चव्हाण यांनी यावेळी दिले. खासदार विनायक राऊत यांनी सांगितले की, या घाटमार्गासाठी निधीची तरतूद झाल्यास प्रलंबित 12 किमीच्या रस्त्याचे काम मार्गी लागून गेल्या वीस वर्षांपासूनचा हा प्रश्न सुटेल. या रस्त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र व कोकण हे जोडले जाणार आहेत. तसेच पावसाळ्यात दळणवळणाचे साधन उपलब्ध होईल.