सिंधुदुर्ग - शिवसेना खासदार विनायक राऊत आणि राणेंचे वैर सर्वज्ञात आहे. त्यानंतर आणखी एकदा त्यांच्यातील शाब्दीक चकमक पुढे आली आहे. खासदार विनायक राऊत हे मातोश्रीचे चप्पल चोर असून ते स्वत: मॅट्रीक पास नसल्याचे सांगत माजी खासदार निलेश राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर एकेरी उल्लेख करत टीका केली आहे.
जिथे असशील तिथे फटके देईन-
खासदार राऊत यांनी नारायण राणे आणि फडणवीसांवर केलेल्या टिकेला प्रत्युत्तर देताना निलेश राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर जहरी टीकास्त्र सोडले आहे. तसेच विनायक राऊत यांनी स्वत:ची भाषा न बदलल्यास जिथे दिसेल तिथे फटके लावणार असल्याचा इशारा देखील निलेश राणे यांनी दिला आहे. या संदर्भाचा एक व्हिडिओ त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
हिंमत असेल तर राजीनामा द्यावा-
निलेश राणे व्हिडिओच्या माध्यमातून बोलताना म्हणाले की, ''विनायक राऊत हे सामाजिक कार्यावर बोलणार नाहीत, त्यांनी नारायण राणे, फडणवीस यांच्यावर टीका केली.. मुळात ते मातोश्री़चे चप्पल चोर आहेत. स्वत: मोदी लाटेत निवडणून आले.. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी राजीनामा देऊन आता निवडणुकीला सामोरे जावे. आणि निवडून येतात का ते पाहावे, पण ती हिंमत ते दाखवणार नाहीत''
'विनायक राऊत म्हणजे मातोश्रीचे थापा आहेत. ते स्वत: नॉन मॅट्रीक आहेत. संसदेत काय बोलतात त्यांचे त्यांना समजत नाही, वैयक्तीक आयुष्यातही त्यांचे गुण चांगले नाहीत'' खासदारकीचा एकही गुण नाही, अशीही टीका निलेश राणे यांनी एकेरी भाषेचा वापर करत केली आहे.
२०२४ ला खासदार राऊत यांना कोकणातून हद्दपार करणार
तसेच २०२४ च्या निवडणुकीत विनायक राऊत यांचा कायमचा बंदोबस्त करणार,त्यांना कोकणातून हद्दपार करणार असल्याचे आव्हान देतानाच, निलेश राणे यांनी विनायक राऊत यांना भाषा बदलली नाही तर, ''जिकडे दिसशील तिकडे फटके देईन'', असा धमकीवजा इशाराही दिला आहे.
काय म्हणाले होते राऊत-
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी "देवेंद्र फडणवीस यांच्या हट्टामुळे शिवसेना आणि भाजपची युती तुटली" असे विधान केले होते. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणेंसारख्या नॉन मॅट्रिक माणसाला मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर ते सिंधुदुर्गाचं दुर्दैव असेल, अशी टीकाही त्यांनी नारायण राणेंवर केली होती.
तसेच सिंधुदुर्गातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना एकदा, नव्हे तर तीन वेळा फोन केला होता, असा खुलासा विनायक राऊत यांनी केला होता. यावरून निलेश राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर एकेरी उल्लेख करत सडकून टीका केली आहे.