सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील दोडामार्ग आडाळी येथील केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाचा आयुर्वेद संशोधन प्रकल्प हस्तांतरणावरून सुरू झालेला वाद अधिकच पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खासदार विनायक राऊत यांनी हा प्रकल्प पळवून नेण्याच्या आपल्याच आघाडी सरकारमधील सहकारी मंत्र्यांचा धिक्कार केला असून आम्ही मेलेल्या आईचे दूध प्यायलेलो नाही, असे म्हटले होते. यावर नवखा काँग्रेसी मंत्री तुमच्या नाकावर टिच्चून प्रकल्प पळवण्याची दादागिरी करतो? ही गोष्ट म्हणजे, आताची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची स्वाभिमानी सेना नाही, असा टोला भाजपाचे प्रदेश सचिव माजी आमदार प्रमोद जठार यांनी लगावला आहे.
खासदार विनायक राऊत म्हणाले होते, की केंद्राकडून कोकणसाठी मंजूर केलेला हा प्रकल्प लातूरला हलवा, अशी मागणी सहकारी काँग्रेसचे मंत्री अमित देखमुख यांनी केली आहे. देशमुख यांनी केलेला हा प्रकार निंदनीय असून दिवंगत विलासराव देशमुख असते, तर अशा घटना झाल्या नसत्या. अमित देशमुख यांनी आम्हाला भेटायला वेळ दिला नाही, आमच्या पत्रांना उत्तरे दिली नाहीत. एवढेच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनादेखील साधी भेटही देण्याचे नकारल्याचा गौप्यस्फोट खासदार राऊत यांनी केला होता.
बोलताना माजी आमदार प्रमोद जठार त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपा नेते माजी आमदार प्रमोद जठार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री शिवसेनेचा असूनसुद्धा आघाडी सरकारमधील एक नवखा काॅंग्रेसचा मंत्री शिवसेनेच्या खासदार विनायक राऊत व ज्यांची विकास कामे कमी पण राजकारणातील तंत्र नेहमीच उच्च राहिले अशा उदय सामंताच्या पत्रांना उत्तरे सोडा साधी भेटसुद्धा देत नाही. काॅंग्रेस, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी तुम्हाला आता पुरते ओळखले आहे. ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची स्वाभिमानी सेना नसून सत्तेसाठी हिंदुत्व सोडून काहीही करण्यासाठी उद्धव ठाकरेंना भाग पाडणारी लाचार राऊतसेना आहे. ही काय काेकणाचा विकास करणार? किमान सांगू तरी नका, की अमित देशमुखसारखा नवखा मंत्रीही तुम्हाला भेट देत नाही, तुमच्या पत्रांना उत्तर देत नाही. आम्हाला लाज वाटते सांगायला की हे असले आमच्या कोकणाचे नेते आहेत, ज्यांच्या नाकावर टिच्चून एक नवखा काँग्रेसी मंत्री दिवसाढवळ्या कोकणाच्या विकासासाठी केंद्रातील मोदी सरकारकडून आम्ही मंजूर करुन आणलेला प्रकल्प पळवताे, असे जठार म्हणाले. प्रमोद जठार यांनी संतप्त इशाराही दिला आहे, हा प्रकल्प सिंधुदुर्गात झाला नाही तर आघाडी सरकारच्या मंत्र्यांना भाजप सिंधुदुर्गात फिरकू देणार नाही. आम्ही आमच्या प्रयत्नाने आणलेला प्रकल्प निदान राखण्याचे तरी कर्तृत्व दाखवा, अन्यथा अशा कोकणसाठीच्या बिनकामाच्या नेत्यांचे सिंधुदुर्गातील फिरणे बंद करावे लागेल.हेही वाचा - हाथरस घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा द्या; सत्यशोधक महिला आघाडीची जिल्हाधिकारी, सर्व तहसीलदारांकडे मागणी