सिंधुदुर्ग - देवगड तालुक्यातील तांबळडेग गावासह लगतच्या पाच गावांना समुद्राच्या लाटांचा फटका बसला आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात किनारपट्टीची धूप झालीय. समुद्र किनाऱ्यावरील सुरूंची झाडे वाहून जात आहेत. त्यामुळे लोकवस्तीला देखील धोका निर्माण झाला आहे. उधानाच्या लाटांमुळे तांबळडेग येथील मासळी सुकवण्यासाठी बांधण्यात आलेला ओटा कोसळला असून त्याचा काही भाग समुद्रात वाहून गेला आहे.
तांबळडेगसह उर्वरित गावांच्या एकबाजूला समुद्र तर दुसऱ्या बाजूने खाडी असल्याने जमिनीची धूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. किनारपट्टीवर असलेली झाडे पाण्यात वाहून गेली आहेत. ग्रामस्थांनी धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची मागणी केली आहे. मागील वर्षी अशाच उधानाच्या लाटांमुळे येथील स्मशानभूमी पूर्णतः वाहून गेली होती.
वेळीच तांबळडेग गावात धूप प्रतिबंधक बंधारा न झाल्यास येथील गावासह चार ते पाच गावाच्या लोकवस्तीला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. या ठिकाणी माजी मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी भेट दिली होती. त्यावेळी सरपंचांनी धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची मागणी केली होती. तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकणातील पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत ऑनलाइन बैठक देखील झाली. यानंतर संरक्षण भिंतीची गरज असल्याची पालकमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले होते. मात्र अद्याप हे काम मार्गी लागलेले नाही.
येणाऱ्या काळात गावात धूप प्रतिबंधक बंधारा न झाल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते, असे सरपंच जगदिश मालडकर यांनी सांगितले. मागील तीन वर्षांपासून या समस्येला तोंड देत असल्याचे ते म्हणाले. बंधाऱ्याची मागणी केल्यानंतरही ते मंजूर होत नाही. १९९२ साली धूप झाल्यानंतर ४०० मीटर बंधारा झाला. पुढचा मात्र होत नाही, असे ते म्हणाले.