सिंधुदुर्ग : जिल्हा न्यायालयाच्या बाहेर जमलेली भाजपा कार्यकर्त्यांची गर्दी व आमदार नितेश राणे यांची गाडी पोलिसांनी अडवल्या नंतर पोलिसांशी झालेली बाचाबाची व बेकायदेशीर जमाव जमवणे, सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करणे यासह अन्य कारणे दाखवत पोलिसांकडून गुन्हा दाखल केल्याची माहिती सिंधुदुर्ग पोलीस ठाण्यातुन प्राप्त झाली आहे.
आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाबाहेर झालेल्या हाय व्होल्टेज ड्राम्या प्रकरणी माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजपाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता होतीच. याबाबतची प्रक्रिया देखील पोलिस प्रशासनाकडून सुरू करण्यात आली होती. दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार वैभव नाईक यांनी देखील निलेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत या प्रकरणी पोलिसात तक्रार देणार असल्याचे सांगितले होते. यानंतर पोलिसांकडून या प्रकरणी हालचाली गतिमान होऊ लागल्या होत्या. जिल्हा न्यायालयाच्या बाहेर जमलेली भाजपा कार्यकर्त्यांची गर्दी व आमदार नितेश राणे यांची गाडी पोलिसांनी अडवल्या नंतर पोलिसांशी भाजपा कार्यकर्त्यांची झालेली बाचाबाची व बेकायदेशीर जमाव करणे, सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करणे यासह अन्य कारणे दाखवत पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वृत्ताला प्रशासकीय सूत्रांकडूनही दुजोरा देण्यात आला आहे.