सिंधुदुर्ग - महाष्ट्रासह इतर राज्यातून अनेक पर्यटक निसर्गरम्य सावडाव धबधब्यावर गर्दी करताना दिसतात. मात्र गतवर्षी प्रमाणे याहीवर्षी वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या कणकवली तालुक्यातील सावडाव धबधबा वर्षा पर्यटनासाठी अनिश्चित कालावधीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे. खबरदारी म्हणून धबधब्याकडे जाणारा मुख्य मार्ग बंद करण्यात येणार असल्याचे सरपंच अजय कदम यांनी सांगितले.
सुरक्षित पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध
पर्यटनासाठी सर्वात सुरक्षित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावडाव येथील धबधब्याने भुरळ घातल्यानंतर पर्यटक तेथे गर्दी करत करतात. मात्र, कोरानाचे सावट असल्याने धबाधबा बंद करण्यात आला होता. गेले एक वर्षे सोडले तर दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढल्याचे दिसून येत आहे. यावर्षी अजून मान्सून पावसाने दमदार हजेरी न लावल्यामुळे सावडाव धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झालेला दिसत नाही. मात्र, येत्या काही दिवसात दमदार पावसाने हजेरी लावल्यानंतर धबधबा प्रवाहीत होणार आहे. तत्पूर्वी स्थानिक प्रशासन नेहमीच वर्षा पर्यटकांच्या स्वागतासाठी कायमच सज्ज झालेले दिसून येत होते. त्याचबरोबर पर्यटकांची गैरसोय होणार नाही यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत काळजी घेताना दिसायचे.
खबरदारी म्हणून धबधब्याकडे जाणारा मार्गही बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावडाव धबधबा ग्रामपंचायत प्रशासनाने गतवर्षीप्रमाणे यावर्षीही अनिश्चित कालावधीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर खबरदारी म्हणून धबधब्याकडे जाणारा मार्गही बंद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत अहे. दरवर्षी हजारो पर्यटक सावडाव धबधब्यावर येत वर्षा पर्यटनाचा आनंद घेत असतात. मात्र, यंदाही कोरोना संकटामुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडणार आहे. याचा फटका येथील रोजगार मिळालेल्या चार ते पाच व्यावसायिकांनी होणार आहे.
ग्रामपंचायत करालाही मुकणार
ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या अभ्यंगत पर्यटन करालाही मुकावे लागणार आहे. मात्र, कोरोनामुळे पर्यटकांनी आपल्यासह कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना संकट दूर झाल्यावर खुशाल वर्षा पर्यटनासाठी या. मात्र आजच्या कारोना प्रादुर्भावाच्या काळात सर्वांनी घरीच राहावे. तसेच वर्षा पर्यटनांसाठी नागरिकांनी जीव धोक्यात घालून येवू नये, असे आवाहन सावडाव सरपंच अजय कदम, उपसरपंच दत्ता काटे ग्रामसेवक शशिकांत तांबे व ग्रामस्थांनी केले आहे.
सावडावं धबधबा अनिश्चित काळासाठी बंद
सध्याची परिस्थिती पाहता जिल्हात कोरोना रूग्णसंख्या जास्त आहे. त्याच अनुषंगाने, सावडाव धबधबा पर्यटन स्थळ शासनाच्या नियमानुसार अनिश्चित काळासाठी पूर्णपणे बंद ठेवत आहोत, असे सावडाव सरपंच अजय कदम यांनी सांगितले आहे.