सिंधुदुर्ग - कोरोनाच्या काळात मुंबईतून येण्या-जाण्यासाठी बनावट पास देणारे रॅकेट आज मुबई क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी सिंधुदुर्ग पोलिसांच्या मदतीने उघड केले. यात मुंबईतील चौघा टॅक्सी चालकांचा समावेश आहे. या चौघांनाही आज मालवण तालुक्यातील हडी येथे अटक करण्यात आली. दरम्यान यातील तिघांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले असून एकाला येथील न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेल्यांमध्ये अब्दुल करीम मोहम्मद शेख ( २८), समीर सम्मशुद्दीन शेख (३६), नुर माहम्मद शेख (३०) या तिघांचा समावेश आहे. तर मालवण पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संशयित आरोपींमध्ये सर्फराज हसन शेख (३७) याचा समावेश आहे. हे चारही युवक मुंबईत टॅक्सी डायव्हर म्हणून कार्यरत होते. मालवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण यांनी याप्रकरणी तक्रार दिल्याने संबंधित चौघा संशयीतांच्या विरोधात भादवि कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४, आय. टी. ऍक्ट ६६ (सी) ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यात बनावट कागदपत्रे बनवून फसवणूक करण्यात आल्याचे म्हटले आहे.
यातील तिघांना मुंबई पोलीसांनी ताब्यात घेतल्याने उर्वरीत सर्फराज याला मालवण पोलिसांनी अटक केली आहे. त्याला मालवण न्यायालयासमोर हजर केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. मुंबईहून कोकणात येणाऱ्या अनेक चाकरमानी लोकांजवळ बोगस ई-पास सापडले होते. अनेक ई-पासवरचे कोड स्कॅन केल्यानंतर ते बोगस असल्याचे समोर आले होते. सावंतवाडी तहसीलदार म्हात्रे यांनी अनेक पास बोगस असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आणून दिले होते. विशेष म्हणजे हे बोगस पास बनवून चाकरमानी लोकांकडून मोठी रक्कम उकळण्याचे कामही या रॅकेटने केल्याचे समजते. या पासच्या घोळामुळे मुंबई गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेश द्वारावर खारेपाटण येथे मुंबईकर चाकरमान्यांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रशासनावरही मोठा ताण आला होता. आता हे लोक पोलिसांच्या हाती लागल्याने अनेक गोष्टी समोर येणार आहेत.