सिंधुदुर्ग - जिल्हा बँकेत केलेली "ती" नोकरभरती नाही, तर मानधन तत्त्वावर घेतलेले ते कर्मचारी आहेत, असे स्पष्टीकरण जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी संचालक मंडळाच्या उपस्थितीती घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिले आहे. बँकेतील कथित नोकर भरतीवरून जिल्ह्यात एकच राजकारण पेटले होते. यावेळी भाजपाचे माजी मंत्री रवींद्र चव्हाण, बँक संचालक अतुल काळसेकर, भाजप जिल्हाध्यक्ष आणि बँकेचे माजी अध्यक्ष राजन तेली यांनी या नोकर भरतीच्या निमित्ताने जिल्हा बँकेवर प्रश्चचिन्ह उभे केले होते.
'राजकारण्यांनी बँक बदनाम करू नये'
जिल्हा बँकेत अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने ग्राहकांना तत्पर सेवा देता यावी यासाठी काही कर्मचारी केवळ दैनंदिन मानधनावर घेण्यात आले आहेत. त्यामुळे ही नोकर भरती नाही असे सांगतानाच सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची व शेतकऱ्यांच्या घामातून निर्माण झालेली सहकारी बँक आहे. आजपर्यंत या बँकेने शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. त्यामुळे या बँकेवर राजकारण्यांनी विनाकारण आरोप करून बँकेची बदनामी करू नये. या बँकेत शेतकऱ्यांसह साडेचार लाख ठेवीदारांच्या ठेवी आहेत. त्यांचा विश्वासाला तडा जाईल, असे राजकारण्यांनी करू नये, असा सल्ला जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी विरोधकांना यावेळी दिला आहे.सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बँकेचे संचालक व्हिक्टर डांटस, विकास सावंत, विकास गावडे, आत्माराम ओटवणेकर, प्रज्ञा परब, प्रमोद धुरी आदी संचालक उपस्थित होते.
'राजन तेली राजकीय अड्ड्यावर बसणारे'
सावंत म्हणाले, की सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या २०१८-१९चे नाबार्डकडून करण्यात आलेल्या ऑडिटमध्ये बँकेला अ वर्ग मिळाला आहे. गेली अनेक वर्षे सातत्याने अ वर्ग बँकेला मिळत आहे. कोरोना कालावधीतही या बँकेचा एनपीए शून्य टक्के राहिला आहे. १२२७ सभासद संस्था व साडेचार लाख ठेवीदार या बँकेचे आहेत. कोरोना कालावधीत शेतकऱ्यांना या बँकेने चांगली सुविधा पुरविली आहे. बँकेच्या व्यवसायावर कोणताही परिणाम झालेला नाही. उलट ठेवीदारांच्या ठेवी वाढल्या आहेत. संचालक मंडळाने चांगले काम केले आहे. पारदर्शक कारभार करण्याचे काम संचालक मंडळाने केले आहे. असे असतानाही काही राजकारणी बँकेत पैसे घेऊन नोकर भरती केली असल्याचे बँकेवर उलट-सुलट आरोप करून बँकेला बदनाम करण्याचे कारस्थान करीत आहेत. मुळात जिल्हा बँकेकडे कर्मचारी वर्ग अपुरा आहे. मात्र, नोकर भरती ही सध्या बंद आहे. त्यामुळे नोकर भरती करण्यात आलेली नाही. जिल्हा बँक ही राजकीय संस्था नाही. तर गोरगरीब जनतेची बँक आहे. राजन तेली हे नेहमीच राजकीय अड्ड्यावर बसणारे आहेत. राजन तेली हे जिल्हा बँकेचे राजकीय दुकान करू इच्छित आहेत. मात्र, हे आम्ही होऊ देणार नाही. महाविकास आघाडी एकत्रितपणे जिल्हा बँक निवडणूक लढणार असल्याचेही सावंत म्हणाले.