सिंधुदुर्ग - जंगलात लाकूड वेचायला गेलेल्या महिलेवर हत्तीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे बांबर्डे येथे घडली. अश्विनी आप्पासाहेब देसाई (वय ४५) असे जखमी महिलेचे नाव आहे. या परिसरात पुन्हा हत्तींचा उपद्रव वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अश्विनी देसाई या लाकडे वेचण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. लाकडे वेचण्यात मग्न असताना त्यांच्यावर अचानक हत्तीने हल्ला चढवला. त्यांचा पाय आपल्या सोंडेत पकडून हत्तीने त्यांना भिरकावून दिले. यात अश्विनी या गंभीर जखमी झाल्या आणि त्याच ठिकाणी बेशुद्ध पडल्या. त्यांच्या पायाला आणि पाठीच्या कण्याला मार बसल्याने त्यांना जागेवरून उठता येत नव्हते. त्यामुळे अश्विनी दोन दिवस तशाच अन्न पाण्याविना जंगलामध्ये पडून होत्या. अखेर त्यांनी कसे बसे घसपटत घराजवळील नदी गाठली. त्याठिकाणी पाणी प्यायल्यावर पुन्हा मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. त्यांचा आवाज ऐकून ग्रामस्थांनी नदीकडे धाव घेतली. अश्विनीची अवस्था पाहून ग्रामस्थांना घडल्या घटनेची कल्पना आली. ग्रामस्थांनी तत्काळ जखमी अश्विनी यांना आधी ग्रामीण रुग्णालय आणि नंतर गोवा बांबूळी येथे दाखल केले.
दरम्यान, ग्रामस्थांनी या प्रकाराची माहिती वनविभागाला दिली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गोवा बांबूळी रुग्णालयात जाऊन अश्विनी देसाई यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दोडामार्ग परिसरातील हत्तींचा उच्छाद गेले काही महिने कमी झाला होता. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच नागरिकांनी हत्तीच्या बंदोबस्ताची मागणी वनविभागाकडे केली आहे.