सिंधुदुर्ग - कोरोनाच्या संकटात लढण्यासाठी येथील जनतेला सुरक्षा कवच देण्याचा प्रयत्न आहे. कोरोना विषाणूबरोबरच पावसाळ्यात साथीचे आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. या सर्व आजारांविरोधात लढण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती आवश्यक आहे. यासाठीच जिल्ह्यात १० लाख आर्सेनिक एल्बम-30 या गोळ्यांचे वितरण करण्यात आले आहे, असे भाजप आमदार नितेश राणे यांनी सांगितले.
कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी केरळसारख्या राज्यात या गोळ्या फायदेशीर ठरल्या आहेत. त्याचे चांगले परिणाम समोर आले आहेत. दहा लाख आर्सेनिक एल्बम-30 गोळ्या वितरीत करणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील एकमेव जिल्हा असल्याचे आमदार राणे यांनी स्पष्ट केले. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ मंडळींच्या सल्ल्यानुसारच या गोळ्यांचे वाटप सुरू आहे. डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार या गोळय़ांचा डोस सेवन करा व आपली रोगप्रतिकारक शक्ती अधिक मजबूत करा, असे आवाहन राणे यांनी नागरिकांना केले.
गोळ्यांचे वाटप करताना कोणताही भेदभाव केला जाणार नाही. या कामात मी कोणावरही टीका-टिप्पणी करणार नाही. नागरिकांना गोळ्या घरपोच मिळाल्यानंतर आमची वैद्यकीय टीम संबंधित कुटुंब प्रमुखाचे नाव, सही व मोबाईल नंबर घेणार आहेत. पुढील डोस देताना डॉक्टरांकडे त्या गावातील नागरिकांची माहिती असावी, यासाठी त्यांची नोंदणी केली जाणार असल्याचे राणे यांनी सांगितले.