सिंधुदुर्ग - आंबोलीच्या हिरण्यकेशी नदीपात्रातून गोड्या पाण्यातील माशाच्या नवीन प्रजातीचा शोध लावण्यात यश आले आहे. 'स्चीस्टुरा हिरण्यकेशी' असं या माशाच्या प्रजातीला नाव देण्यात आले आहे. या माशाची प्रजात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे, शंकर बालसुब्रमण्यम आणि डॉ. प्रवीणराज जयसिन्हा या संशोधकांनी जगासमोर आणली आहे.
पश्चिम घाटातील आंबोली हे गाव जैवविविधतादृष्ट्या अतिशय संपन्न व संवेदनशील समजले जाते. या ठिकाणी नेहमीच विविध क्षेत्रांतील संशोधकांकडून संशोधन करण्यात आली आहेत. यामध्ये विविध प्रकारचे बेडूक, साप, पक्षी, फुलपाखरे, वनस्पती यांच्या नवनवीन प्रजाती संशोधनाअंती जगाच्या समोर आल्या आहेत. यातल्या काही प्रजाती तर, जगाच्या पाठीवर केवळ आंबोलीमध्येच सापडतात, त्यामध्येच आता आणखी एक या गोड्या पाण्यातील माशाची भर पडली आहे. हिरण्यकेशी अर्थात सोनेरी केस असलेला हा मासा सध्यातरी हिरण्यकेशी येथील उगमापाशी असलेल्या कुंडामध्ये आढळून आलेला आहे. अद्याप या माशाची नोंद इतरत्र कुठेही आढळलेली नाही. हा मासा हिरण्यकेशी नदी पात्रात सापडल्याने या माशाला या नदीच्याच नावावरून हे स्चीस्टुरा हिरण्यकेशी असे नाव देण्यात आले आहे.
आंबोलीच्या नावांमध्ये या संशोधनामुळे आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. यापूर्वी तेजस ठाकरे यांनी सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पालींच्या दुर्मीळ प्रजाती शोधून काढल्या होत्या. तेजस ठाकरे यांच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील जीवशास्त्र मासिकांनीही प्रसिद्धी दिली आहे. माशाच्या या नवीन प्रजातींना शोधण्यासाठी तेजस यांना अंडर वॉटर फोटोग्राफर शंकर बालसुब्रमण्यम आणि डॉ. प्रवीणराज जयसिन्हा यांचे सहकार्य मिळाले आहे.
यापूर्वी तेजस ठाकरे यांनी काही खेकड्यांच्या प्रजातींचा शोध लावला आहे. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये हिंडून तेजस यांनी तब्बल 11 दुर्मीळ प्रजातींचा शोध लावला आहे. त्याआधी कला शाखेत दुसऱ्या वर्षाला असताना त्यांनी खेकड्याच्या पाच प्रजाती शोधल्या. खेकड्यांच्या प्रजातीबद्दलचा त्यांचा शोधनिबंध न्यूझीलंडमधील ‘झुटाक्सा’ अंकात प्रसिद्ध झाला. या नियतकालिकात आणि वेबसाइटवर तेजस ठाकरे यांचं दुर्मीळ खेकड्यांबद्दलचे दुसरे संशोधन प्रसिद्ध झाले होते.