सिंधुदुर्ग - जिल्हा बँकेत सध्यस्थितीत कोणतीही नोकर भरती नाही. तसेच नोकर भरतीबाबत कोणताही निर्णय अथवा ठराव जिल्हा बँकेने घेतलेला नाही. मात्र जिल्हा बँकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत हे अनेकांना नोकर्यांचे आमिष दाखवत आहेत. त्यांच्या या फसवणुकीला बळी पडू नका, असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक अतुल काळसेकर यांनी आज केले. याबाबत आपण तक्रार केली असून वेळ पडल्यास आम्ही कोर्टात जाऊ, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. कणकवली येथील भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काळसेकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदत मागील महिन्यात संपलेली आहे. कालावधीत धोरणात्मक निर्णय घेऊ नयेत असे संकेत आहेत. मात्र जिल्हा बँकेच्या निवडणुकीला समोर ठेवत बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत हे मतदारांना भुलवण्यासाठी अनेक आमिषे दाखवीत आहेत. बँक संचालक म्हणून बँकेचा दर्जा टिकवणे ही आमची जबाबदारी आहे. मात्र बँकेचे अध्यक्ष अनेक चुकीचे निर्णय घेत असल्याने बँकेची पत खालावण्याची भीती निर्माण झाली आहे. बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक कर्मचार्यांना कंत्राटी नोकरीचे आमिष दाखवले जात आहे.
दरम्यान जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बँक सभासदांना नोकरीचे गाजर दाखवत बँकेत अनावश्यक लोकांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे ठेवीदारांचे पैसे वाया जात असून हे खपवून घेतले जाणार नाही. बँकेचा उपयोग आतापर्यंत राजकारणासाठी केला जात नव्हता. मात्र श्री सावंत यांनी आपल्या राजकीय वापरासाठी बँकेच्या नावाचा वापर केला. आपल्याला आमदारकी मिळावी व आपली पत वाढविण्यासाठी बँकेचा उपयोग सतीश सावंत यांच्याकडून होत असल्याचा गंभीर आरोप अतुल काळसेकर यांनी केला.
ते म्हणाले, ज्या सहकारी बँकांनी असे निर्णय घेतले त्या बँका रसातळाला गेल्या. बँकेच्या पैशातून सतीश सावंत यांनी केलेल्या बॅनरबाजी जाहिरात खर्चाला नाबार्डकडून ऑडिट रिपोर्ट मध्ये आक्षेप घेण्यात आला. सार्या प्रकारात जिल्हा बँक रसातळाला जाण्यास सुरुवात झाली असून, एनपीए चे प्रमाणही वाढतच आहे. वारेमाप पैसा खर्च करण्याच्या प्रकारामुळे बँक अडचणीत येण्याची शक्यता आहे. दरम्यान पंतप्रधान सहाय्यता निधीला मदत करू नका तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करा, असे आवाहन आणि प्रचार सिंधुदुर्गातील शिवसेना नेत्यांनी केला. प्रत्यक्षात मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सिंधुदुर्गसाठी एक रुपया देखील आला नाही. याउलट पंतप्रधान सहाय्यता निधीतून जिल्हा रुग्णालयासाठी २८, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासाठी ९ तर कणकवली उपजिल्हा रुग्णालयासाठी १० व्हेंटिलेटर उपलब्ध झाले, अशी माहितीही भाजप नेते आणि जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर यांनी आज दिली.