सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील देवगड तालुक्यात असणारे मच्छिमार प्रदीप कोयडे यांना मासेमारी करत असताना जाळ्यात १३ समुद्री घोडे सापडले होते. जाळ्यात अडकलेल्या या १३ समुद्री जीवांना त्यांनी पून्हा समुद्रात सोडून जिवदान दिले आहे.
जगभरात 'सी-हॉर्स' नावाने प्रसिद्ध असलेला हा एक दुर्मिळ जलचर आहे. इंग्रजीच्या ‘एस’ या अक्षराप्रमाणे आकार असणाऱ्या या समुद्री घोड्याच्या जगभरात एकूण पन्नास प्रजाती आहेत. सी-हॉर्स हा मासा या गटात मोडतो पण माशासारखा दिसत नाही. समुद्री घोडा हा खरं तर बॉनी प्रकारातला मासा आहे. त्यांच्या अंगावर खवले माशाप्रमाणे नसतात. त्याऐवजी संपूर्ण शरीरावर असलेल्या कड्यांमध्ये व्यवस्थित असलेल्या हाडांच्या पट्टयातून त्यांची पातळ त्वचा ताणलेली असते. शास्त्रीयदृष्ट्या हा जलचर 'हिप्पोकॅम्पस' या गटातला आहे.
देवगड येथील पारंपरिक मच्छिमार प्रदीप कोयडे नेहमी प्रमाणे खाडीत मासेमारी करत होते. त्यावेळी त्यांना अशा प्रकारचे १३ समुद्री घोडे सापडले होते. जाळ्यात अडकल्याने या समुद्री घोड्यांचा जीव धोक्यात होता. म्हणून या समुद्री घोड्यांना त्यांनी जाळ्यातून सुखरूप बाहेर काढले व पुन्हा त्याच खाडीपात्रात सोडून दिले. 'अशा दुर्मिळ मस्य प्रजातींचे रक्षण व्हायला पाहिजे', असे प्रदीप कोयडे यांनी यावेळी ईटीव्ही भारत सोबत बोलताना सांगितले. प्रदीप यांचे हे कार्य नक्कीच कौतुकास्पद असल्याची चर्चा परिसरात आहे.