सिंधुदुर्ग - जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी 2 जुलैपासून संपूर्ण जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर केले आहे. मात्र, सावंतवाडी येथील नागरिकांनी लॉकडाऊनला फारसा प्रतिसाद दिलेला नाही. सावंतवाडी शहरात नागरिकांचा सध्या मुक्तसंचार सुरू आहे. कणकवली शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ जुलैपासून पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. यावेळी जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला. मात्र, असे असतानाही सावंतवाडी शहरात या लॉकडाऊनच्या दुसऱ्याच दिवशी लोकांचा मुक्तसंचार दिसून येत आहे. विशेष म्हणजे दुचाकी व अन्य गाड्यांना बंदी असतानाही सराईतपणे दुचाकीस्वार शहरात फिरताना दिसत आहेत.
बाजारात तर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली का असा सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघटनेने या सरसकट लॉकडाऊनला विरोध करीत जिल्हा बंद पाळला. त्यावेळी मेडिकल वगळता अत्यावश्यक सेवेची सर्व दुकानेही बंद ठेवण्यात आली. मात्र, दुसऱ्याच दिवशी अत्यावश्यक सेवेच्या दुकाने उघडल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.