पणजी - उत्तर गोव्यातील सत्तरी तालुक्यातील शेळ-मेळावली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. त्यामुळे सरकारने हा प्रकल्प येथून हलवावा, तसेच आंदोलनादरम्यान स्थानिकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत आणि यासाठी पुन्हा येथे पोलीस फौजफाटा पाठवू नये, अशी मागणी उद्योग मंत्री तथा वाळपईचे आमदार विश्वजीत राणे यांनी आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे.
प्रस्तावित आयआयटी प्रकल्प पणजीपासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावरील सत्तरी तालुक्यातील शेळ-मेळावली या ठिकाणी सरकारने उभारण्याची घोषणा केल्यापासून स्थानिकांकडून त्याला विरोध होत आहे. 5 जानेवारी रोजी सीमारेखन करण्यासाठी सरकारी यंत्रणा तेथे दाखल झाली, तेव्हा स्थानिकांनी जोरदार विरोध केला. विरोध कायम ठेवत दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच ठेवले. दरम्यान आंदोलन दडपवण्यासाठी पोलिसांकडून लाठिमार करण्यात आला. लाठिमाराला प्रत्युत्तर म्हणून स्थानिकांनी पोलिसांवर दगडफेक केली. पोलीस आणि नागरिकांमधील संघर्ष चिरघळल्याने पोलिसांनी 21 जणांवर गुन्हे दाखल करून काही जणांना अटक केली.
आंदोलकांना इतर गावातून पाठिंबा
त्यानंतर पोलिस बंदोबस्त ठेवून गावात जाणारे रस्ते रोखण्यात आले होते. दोन दिवासांपूर्वी हा बंदोबस्त उठविण्यात आला आहे. शेळ- मेळावली ग्रामस्थांच्या या आंदोलनाला सोमवारपासून सत्तरी तालुक्यातील अन्य गावांतून देखील पाठिंबा मिळू लागला आहे. यामध्ये वेळगे, सावर्डे, करमळी, सालेली, तार, कुडशे, कुमठळ, करंझोळ, होंडा, शिरसोडे, बाराजण, खडकी, कुंभारखण, पर्ये, म्हावशी, खोतोडे आणि धामाशे ग्रामस्थांचा सहभाग आहे. मेळावलीवासियांच्या जमिनीसाठी आयआयटी प्रकल्पाला विरोध करताना आता तालुक्यातील जमीन मालकीचा प्रश्न त्याला जोडला गेला आहे. त्यामुळे हे आंदोलन आता तीव्र झाले आहे.
प्रकल्प रद्द करण्याची मागणी
लोकांचा वाढता विरोध आणि लोकभावना समजून घेत, स्थानिक आमदार तसेच उद्योग मंत्री असलेल्या विश्वजीत राणे यांनी आज या प्रकल्पाला आपला विरोध असून, आपण असेपर्यंत यासाठी जमिनीचे आरेखनच काय एक दगडही रचला जाऊ देणार नसल्याचे म्हटले आहे. आपल्या फेसबुक पेजवर बोलताना राणे म्हणाले की, सत्तरीतील लोकांच्या भावनेचा विचार करून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना हात जोडून विनंती करतो की, शेळ-मेळावलीच नव्हे तर सत्तरी तालुका आणि माझ्या मतदारसंघातून प्रस्थापित आयआयटी प्रकल्प अन्यत्र स्थलांतरित करावा. यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिले आहे. आजची परिस्थिती पाहून तसेच लोकहिताचा विचार करून मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे.
आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत
येथील लोकांनी भाजपला जिल्हा पंचायत निवडणुकीत भरभरून मते देत पाठिंबा दिला आहे. याचा विचार करून आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत. तसेच महिलांवर हात उगारणाऱ्यांवर कारवाई करावी. आम्ही आजपर्यंत सत्तरीतील लोकांवर अन्याय होऊ दिला नाही. आणि इथूनपूढेही अन्याय होऊ देणार नाही. उलट त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्याचे राणे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान सुमारे साडेतीन हजार कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. मात्र स्थानिकांकडून या प्रकल्पाला विरोध होत आहे.