सिंधुदुर्ग - शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर राणे कुटुंब आणि शिवसेनेत जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. शिवसेनेचे माजी मंत्री दीपक केसरकर यांनी नारायण राणेंवर जोरदार टीका केली. ज्यांची मुख्यमंत्री कार्यालयात शिपाई बनण्याची लायकी नव्हती. त्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री केले. तेच आज ठाकरे कुटुंबाबद्दल वाईट बोलतात, असे केसरकर म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही नेते जीडीपी बद्दल बोलतात. पण त्यांनी जीडीपीचा फुल फाॅर्म सांगावा, असा टोला केसरकर यांनी नारायण राणे यांना लगावला आहे. ज्यांची साधी एका कार्यालयात काम करण्याची पात्रता नाही, अशांना बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री केले. ते आज उद्धव ठाकरे व बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करतात. त्यांची मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याची पात्रता आहे का? असा प्रश्न केसरकर यांनी केला.
केसरकर म्हणाले, मी कोकणासाठी लढणार असून तो केवढाही माणूस असो मी त्याविरुद्ध उभा राहणार आहे. मी भाजपामध्ये जाणार ह्या केवळ अफवा होत्या. माझी त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली होती. पण आपण कधीही शिवसेना सोडून जाणार नाही. हे त्यावेळीच स्पष्टपणे सांगितले होते आणि आजही स्पष्ट करतो, की मी कधीही शिवसेना सोडणार नाही.
मला त्यावेळी फक्त उद्धव ठाकरे यांनी मंत्री केलं. कोकणात भाजपाची लाट असताना मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयातून फोन आला. यावेळी देवेंद्र फडणवीस व गोव्याचे मुख्यमंत्री यांनी मला पतपंधान नरेंद्र मोदी यांच्याशी एकत्र चर्चा करायला लावली होती. पण मी भाजपामध्ये गेलो नाही, असा गौप्यस्फोटदेखील दीपक केसरकर यांनी केला आहे.