सिंधुदुर्ग - जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. त्यात महामार्गाचे काम सुरू असून,अनेक ठिकाणी महामार्ग जलमय झाला आहे. कणकवली बेळणे येथे महामार्गावर अशाच साचलेल्या पाण्यात मंगळवारी रिक्षा स्लिप होऊन अपघात झाला होता. या अपघातातील गंभीर जखमी असलेले रिक्षा चालक संतोष आप्पाजी जेठे (वय 50) यांचा आज (बुधवार) कणकवली उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आहे.
मुंबई -गोवा महामार्गावर बेळणे येथील हॉटेल आशिषसमोर रत्यावर आलेल्या पाण्यात रिक्षा स्लिप होऊन मंगळवारी दुपारी अपघात झाला होता. या अपघातात चालक संतोष आप्पाजी जेठे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पहाटे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली,अखेर आज त्यांचा मृत्यू झाला.
संतोष जेठे कणकवली तालुका पत्रकार संघाचे सदस्य होते सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असायचे.रिक्षा व्यवसाय असल्याने नांदगाव पंचक्रोशीत त्यांचा मोठा मित्र परिवार होता. त्यांच्या निधनाची बातमी समजताच नांदगाव बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. तसेच रिक्षा संघटनेच्यावतीने बंद पाळण्यात आला. जेठे यांचा महामार्ग ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे बळी गेल्याची संतप्त भावना नांदगाव व असलदेवासियांनी यावेळी व्यक्त केली.
दरम्यान, पहिल्याच पावसात महामार्गाची अत्यंत वाईट अवस्था ठिकठिकाणी झालेली पहायला मिळत आहे. बऱ्याच ठिकाणी भराव खचला आहे. तर गटार बांधणीची कामेही अत्यंत निकृष्ट दर्जाची करण्यात आली आहेत.