सिंधुदुर्ग - गोव्याहून नाशिकच्या दिशेने आयशर कंटेनरमधून अवैधरित्या वाहतूक होणारी सुमारे ३२ लाखांची दारू सीमाशुल्क (कस्टम) विभाग कणकवलीच्या पथकाने जप्त केली. सीमा शुल्क विभागाने केलेल्या या कारवाईने सिंधुदुर्गातून होणाऱ्या अवैध दारू वाहतुकीचे कनेक्शन पुन्हा एकदा समोर आले आहे.
हेही वाचा - सिंधुदुर्गात कारच्या धडकेत दोन वृद्ध पादचारी गंभीर जखमी
कारवाईत 32 लाखांची दारू जप्त
काल महामार्गावर गस्त सुरू असताना सीमाशुल्क विभागाच्या जिल्ह्यातील पथकाने संयुक्तरित्या ही कारवाई कणकवली ओसरगाव येथे केली. या कारवाईत 32 लाखाची दारू व आयशर कंटेनर मिळून एकूण 49 लाख 50 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कंटेनर चालकाकडून विसंगत माहिती दिली जात होती
सीमा शुल्क विभागाचे अधीक्षक अभिजीत भिसे यांच्यासह त्यांच्या पथकाची महामार्गावर गस्त सुरू असताना काल पहाटे सुमारे साडेचार ते पाचच्या दरम्यान गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा आयशर कंटेनर संशयास्पद वाटल्याने त्याला थांबवण्यात आले. कंटेनर चालकाकडून विसंगत माहिती दिली जात असल्याने त्याला अधिक चौकशीसाठी कणकवली कस्टम ऑफिसमध्ये आणून पंचांसमक्ष गाडीची तपासणी करण्यात आली. यावेळी गाडीत विनापरवाना दारूचे बॉक्स असल्याचे आढळले.
उत्पादन शुल्क विभागाकडून गुन्हा दाखल
जप्त केलेली दारू, आयशर कंटेनर, कंटेनर चालक व त्याच्यासोबत असलेल्या एका संशयिताला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आले. त्यांच्यावर उत्पादन शुल्क विभागाकडून गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
या कारवाईत सीमा शुल्क विभागाचे अधीक्षक अभिजीत भिसे, राजेश फुले, सीमा शुल्क निरीक्षक दिनेशकुमार मीना, राजेश लांडे, श्री सारंग, हेड हवालदार प्रेमदत्त माने, संदीप कांबळी, निश्चय गंगावणे, पांडुरंग डगरे, चालक रवींद्र वारेसे यांच्यासह जिल्ह्यातील सीमाशुल्क विभागाच्या पंधरा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. सीमा शुल्क विभागाकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे पोलीस प्रशासनासमोर अवैध दारू वाहतुकीवर कारवाईचे आव्हान निर्माण झाले आहे.
हेही वाचा - निलेश राणे आणि विनायक राऊत यांच्यात टोकाचा वाद, सिंधुदुर्गात कडक पोलीस बंदोबस्त