सिंधुदुर्ग - यावर्षी कोरोनामुळे यंदाच्या पर्यंटन हंगामाला फटका बसला असला तरी, सरकारने आता पर्यटनाला परवानगी दिली आहे. त्यामुळे आता 2020 वर्षाला निरोप देण्यासाठी देशभरातून पर्यटक कोकणात दाखल होत आहेत. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यात दरवर्षी 10 ते 15 लाख पर्यटक येतात मात्र, यावर्षी कोरोनाच्या भीतीने पर्यटकांची संख्या कमी झाली आहे.
आतापर्यंत फक्त पाच लाख पर्यटक दाखल
आतापर्यंत फक्त पाच लाख पर्यटक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. मुंबई, कोलकाता या भागातून पर्यटक येथील समुद्र किनारी दाखल झाले आहेत. रेल्वे हा येथे येण्याचा सोयीचा मार्ग असल्याने सध्या रेल्वे स्टेशनवर सुद्धा गर्दी पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग हे पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण आहे. येथील मालवण, वेंगुर्ला, देवगड या भागातील स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनारे, तारकर्लीत होणारं डाॅल्फीनचं दर्शन, सिंधुदुर्ग किल्ला तसेच नारळी पोफळीच्या बागा येथील मालवणी जेवण हे पर्यटकांचे खास आकर्षण आहे.
कोरोनामुळे पर्यटकांचा ओघ कमी
ख्रिसमसच्या सुटीचा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येथे येतात. याही वर्षी मुंबई, पुणे, नाशिक, बेळगाव, बेंगलोर आदी भागातून पर्यटक या ठिकाणी दाखल झाले आहेत. गोव्यात वाढती गर्दी लक्षात घेता पर्यटकांना गोव्याच्या जवळ असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा उत्तम पर्याय असतो, त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची मोठी वर्दळ असते. यावर्षी कोरोनाचा प्रभाव राहिल्याने पर्यंटकांचा ओघ कमी झाला आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाचे सावट असले तरी पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल दाखल झाले असून, कोरोनाचे नियम पाळून पर्यटक पर्यटनाचा आनंद घेत आहेत.
यावर्षीचा 31 डिसेंबर देखील कोरोनाचे सावट आहे.
स्थानिक व्यवसायावर मोठा परिणाम
मालवण हे ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले शहर आहे. या ठिकाणी सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी पर्यटक येतात. यावर्षी कोरोना या वैश्विक महामारीमुळे पर्यटकांचे प्रमाण कमी झाले आहे. पर्यटक घटल्याने त्याचा मोठा परिणाम हॉटेल आणि इतर व्यावसायांवर झाला आहे. गेल्या वर्षी 10 लाख पर्यटकांची नोंद झाली होती. यावर्षी जिल्ह्यात केवळ 5 लाख पर्यटकांची नोंद झाली आहे. अशी माहिती स्थानिक व्यावसायिक शिल्पा खोत यांनी दिली.
कोरोनाचे नियम पाळत पर्यटनाचा आनंद
सागर हेरेकर हे बेंगलोर वरून मालवण मध्ये सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आले आहेत. ते सांगतात यापूर्वी मी इथे येऊन गेलो. आता मी माझ्या कुटुंबासोबत आलो आहे. 31 डिसेंबरपर्यंत पर्यटनाचा आनंद घेऊन मी घरी परतणार आहे. कोरोनामुळे आम्ही स्वतःची काळजी घेण्यासाठी मास्क लावला आहे. सॅनिटायझर सोबत आहे. सोशल डिस्टन्स पाळत पर्यटनाचा आनंद घेत आहोत. अमित कुंभार हे अकलूज वरून आलेत. ते सांगतात कोरोनाची पार्श्वभूमी आहे तरीही सुटी काढून आलो आहे. पर्यटन सुरू झालं. मालवण फिरताना छान वाटतंय. नाताळ सुरू आहे त्यात 2020 एन्ड होत आहे. येथील किल्ला पाहाताना पर्यटनाचा आनंद घेणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.