सिंधुदुर्ग - 60 वर्षांवरील व्यक्ती तसेच 45 ते 59 वर्षे वय आणि विशिष्ट आजार असलेल्या व्यक्तींना सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. हे लसीकरण सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये सुरू करण्यात आले आहे. खासगी रुग्णालयात लसीकरण करण्यासाठी 250 रुपये एवढे शुल्क सरकारद्वारे निर्धारित करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांच्या देखरेखीखाली लसीकरण व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी तसेच 45 वर्षांवरील विशिष्ट आजार असलेल्या व्यक्तींनी ह्या लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खालिपे यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात खासगी रुग्णालयांमध्ये सात ठिकाणी व शासकीय जिल्हा रुग्णालय येथे अशा आठ ठिकाणी कोविड लसीकरण कक्षांचा शुभारंभ करण्यात येत आहे. कणकवलीत चार खासगी रुग्णालयांमध्ये प्रत्येकी अडीचशे रुपये देऊन कोविड लस उपलब्ध करून दिली जाणार आहे. दर दिवशी सरासरी शंभर नागरिकांना लसीकरण करण्यात येईल. त्यामुळे वयाच्या साठ वर्षांवरील नागरिकांना पहिल्या टप्प्यात लसीकरण केले जाणार आहे. तसेच ४५ ते ६० वर्षातील नागरिकांना त्या २० आजारांपैकी आजार असेल तर त्यालाही लसीकरण करता येईल, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश कदम यांनी या कार्यक्रमात दिली.
घाई गडबड न करता लसीकरणाचा लाभ घ्यावा
कोरोना महामारी जिल्ह्यातील डॉक्टर व तालुका आरोग्य विभागाने अहोरात्र मेहनत घेतली. आता कोविड लसीकरण नागरिकांना दिले जात आहे. हे लसीकरण सुरू होणे हे सर्वांसाठी महत्त्वाचे आहे, असे सांगतानाच नागरिकांनी ॲपमध्ये नोंदणी करावी किंवा शासकीय रुग्णालयात आधार कार्ड देऊन शासकीय निकषानुसार नाव नोंदणी करावी आणि घाई गडबड न करता किंवा गर्दी न करता या लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.