सिंधुदुर्ग - राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. असे असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका कोरोनाबाधिताचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे तब्बल 15 दिवसांनी त्याला जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. हा रुग्ण बरा होऊन घरी जात असल्याचे समाधान वाटत आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
हेही वाचा... तब्बल 88 साखर कारखान्यातून होणार हाजारो लिटर 'सॅनिटायझर'ची निर्मिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे हा कोरोना संसर्गित रुग्ण आढळला होता. त्याने 19 मार्चला मंगलोर एक्सप्रेसने मुंबई ते कणकवली असा प्रवास केला होता. या रेल्वे गाडीत 'एस 3' डब्यात कोरोनाबाधित रुग्ण होता. या तरुणाला सहप्रवाशाकडून कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यावेळी रेल्वे प्रशासनाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला होता. या रुग्णाचे रिपोर्ट हे कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर त्याला ओरोस येथील रुग्णालयात आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले होते.
त्यानंतर 14 दिवसांनी त्याचे स्वॅब टेस्ट घेतली असता त्याचे दोन्ही निगेटिव्ह आले. या चाचणीचा अहवाल 3 एप्रिलला मिळाला. मात्र, त्यानंतरही पुढचे काही दिवस त्याला निगराणी खाली ठेवण्यात आले होते. त्याला डिस्चार्ज देण्यात आला असून पुढील 14 दिवस त्याला होम क्वारंटाईन केले आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर कणकवलीतील या 58 वर्षीय व्यक्तीने डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. तसेच नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, मास्कचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी जनतेला केले आहे.