सिंधुदुर्ग - कोकणातील पारंपरिक लोककला असलेल्या दशावतार नाट्यकलेला आता कोरोनाचा फटका बसला आहे. आतापर्यंतच्या इतिहासात दशावतार ही लोककला कधी बंद ठेवण्याची वेळ आली नव्हती. मात्र, कोरोना व्हायरसमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील कानाकोपऱ्यात केले जाणाऱ्या दशावताराचे प्रयोग रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे दशावतार कलाकारांचे मोठे नुकसान होणार आहे. रात्रीच्या राजाची ही व्यथा अनेकांनी आपापल्या परीने मांडायला सुरुवात केली आहे.
दशावतार या कलेला 800 वर्षांचा इतिहास आहे. कोकणात विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे 2 हजार कलाकार या लोककलेवर आपली गुजराण करतात. 100 च्या आसपास ही लोककला सादर करणाऱ्या कंपन्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत आहेत. दशावतार कलाकारांची व्यथा कणकवली हळवल येथील दशावतार लोककलेचे अभ्यासक अमोल राणे यांनी कवितेतून मांडली असून बादल चौधरी यांनी ती कविता मालवणीत अनुवादित करून लोकांसमोर आणली आहे. येत्या दोन महिन्यात गोवा, मुंबई, दिल्ली, नागपूर, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमधे हे दशावतारचे प्रयोग होणार होते. मात्र, ते आता रद्द करण्यात आले आहेत. मार्च, एप्रिल, महिन्यात सादर होणारे नाट्य प्रयोग रद्द करण्यात आल्यामुळे कलाकारांना याचा आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे या नाट्य प्रयोगावर गुजराण करणारे कलाकार हवालदिल झाले आहेत.
दशावतार ही कोकणची ओळख आहे. रात्रीचा राजा आणि दिवसा डोकीवर बोजा अशी स्थिती येथील कलाकारांची असली तरी आजपावेतो त्यांनी ही कला जिवंत ठेवली आहे. आज जागतिक मंदीचा काळ असताना गेल्या 8 शतकांची कला जोपासणाऱ्या या कलाकारांना शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी होत आहे.