सिंधुदुर्ग - कणकवलीत महामार्गाची संरक्षण भिंत आज दुपारी कोसळली आहे. ही भींत पहिल्याच पावसात खचली होती. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. भींत कोसळल्याची माहिती मिळताच आमदार नितेश राणे, शिवसेना नेते संदेश पारकर, नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पाऊस सुरू झाल्यापासून कणकवली एस. एम. हायस्कूल समोरील उड्डाणपूल धोकादायक बनल्याची माहिती प्रशासनाला होती. अनेकदा बैठका व नेत्यांचे पाहणी दौरे होऊन देखील आवश्यक ती काळजी महामार्ग ठेकेदारांनी घेतली नाही. परिणामी सोमवारी दुपारी संरक्षण भिंत कोसळल्याने सर्व्हिस रस्त्यावर माती आली आहे. सुदैवाने जीवितहानी ठळली आहे.
भविष्यात आणखी संरक्षण भींत कोसळून दुर्घटना होण्याची भीती निर्माण झाली आहे. याबाबत जिल्हा प्रशासन काय निर्णय घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार नितेश राणे, शिवसेना नेते संदेश पारकर, नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह कणकवलीतील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.