सिंधुदुर्ग- लॉकडाऊन असतानाही भाजप कार्यकर्ता जावेद शेख विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळल्याने पोलिसांनी त्याला विचारणा केली. मात्र, शेख याने पोलिसांशी हुज्जत घातली. यामुळे जावेद याला पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर या बाबतची माहिती मिळताच कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक अबिद नाईक, संदीप नलावडे यांनी देखील पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांशी वाद घातला. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी या चारही जणांविरोधात शासकीय कामात आणल्याच्या आरोप ठेवत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असतानाही जावेद शेख हा युवक येथील पटकीदेवी परिसरात सातत्याने फिरत होता. याबाबत तेथे ड्युटीवर असणारे पोलीस नाईक आशिष जमादार यांनी विचारणा केली असता जावेद याने त्यांच्यासमवेत वादावादी केली. त्यामुळे जमादार यांनी अन्य पोलिसांसह जावेद याला पोलीस स्टेशनला नेले. या घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष समीर नलावडे व काहींनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. यात पोलीस व राजकीय मंडळी यांच्यात जोरदार वादावादी झाली.
अखेर या प्रकरणी वरील चौघांविरोधात भा. दं. वि. कलम 353, 332, 186, 188, 504, 506, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कणकवलीचे असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर सागर खंडागळे यांनी दिली आहे. दरम्यान अटकपूर्व जामिनासाठी लॉकडाऊनमुळे अर्ज करता येत नसल्याने नगराध्यक्ष समीर नलावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर अटकेची टांगती तलवार असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. या पार्श्वभूमीवर कणकवलीत पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.