सिंधुदुर्ग - वेंगुर्ला नवाबाग येथे पारंपारिक मच्छिमारांना रापणीला रविवारी मोठ्या प्रमाणावर मासळी मिळाली आहे. त्यामुळे खवय्यांनी नवाबाग किनाऱ्यावर खरेदीसाठी एकच गर्दी केली होती. मिळालेल्या मासळीत खडके, सुंगट, मानके, इसवन आदी माशांचा समावेश आहे. गणेश चतुर्थी नंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात मासळी सापडल्याने मच्छीमारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
गणेशोत्सवात चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात दाखल होत असतात. यावेळी मच्छीला मोठी मागणी असते. मात्र, यंदा मुसळधार पाऊस आणि खवळलेला समुद्र यामुळे मासेमारी बंद होती. परिणामी, यावेळी खवय्यांची निराशा झाली होती. त्याचबरोबर हंगाम सुरू होऊनदेखील मासेमारी बंद असल्याने मच्छिमारांना नुकसान सहन करावे लागले होते. दरम्यान, उशीरा का होईना वेंगुर्लेत मोठ्या प्रमाणावर मासे गवसल्यामुळे मच्छीमारांना दिलासा मिळाला आहे.