सिंधुदुर्ग - जिल्ह्यासाठी कोविड -१९ आजाराच्या प्रतिबंधक लसीचा योग्य त्या प्रमाणात पुरवठा करावा. किमान प्रत्येक टप्प्यात २ लाख लसीचा पुरवठा करावा. भविष्यात सिंधुदुर्गात लस कमी पडल्यास गोंधळ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा भाजपा आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनात त्यांनी सिंधुदुर्गातील लसीकरणाबाबत सविस्तर वस्तूस्थिती मांडली आहे. निवेदनाव्दारे त्यांनी सांगितले आहे की, सध्या कोविड - १९ या साथीच्या आजाराला नियंत्रणामध्ये आणण्यासाठी विविध उपाययोजना केंद्र व राज्य सरकार मार्फत आखण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सद्या ४५ वर्षावरील व्यक्तींना व १ मे २०२१ पासून १८ वर्षावरील व्यक्तींना दोन टप्प्यात प्रतिबंधात्मक लस देण्याचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. याबाबत माझ्या सूचना असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या आहेत नितेश राणे यांच्या सूचना
1) जिल्ह्यामध्ये एकूण ५६ ठिकाणी आरोग्य यंत्रणेमार्फत लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. जिल्ह्यामध्ये ४५ वर्षावरील व्यक्तींची संख्या सुमारे २.५० लाख असून त्यापैकी जिल्ह्यात आत्तापर्यंत १ लाख डोसचा पुरवठा करण्यात आला आहे. सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यात लसीचा साठा संपल्याने लसीकरण मोहीम बंद पडली आहे. तरी आजच्या घडीला सुमारे १.५० लाख डोस तातडीने मिळणे गरजेचे आहे.
२) १ मे २०२१ पासून शासनातर्फे १८ वर्षावरील व्यक्तींना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये या वयोगटातील व्यक्तींची संख्या सुमारे ८.५० लाख आहे. म्हणजे जिल्ह्याला आजपर्यंत प्राप्त झालेले १ लाख डोस वगळता अजून ७.५० लाख डोसची आवश्यकता भासणार आहे. या वयोगटामध्ये बहूसंख्य तरूण मंडळींचा समावेश असल्याने शासनाकडून पुरेसा साठा उपलब्ध करून न दिल्यास लसीकरण केंद्रावर कर्मचाऱ्यांसोबत वादविवाद होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
३) जिल्ह्याला लस पुरवठा हा कोल्हापूर जिल्ह्यामार्फत करण्यात येत आहे. यामध्ये जेव्हा कोल्हापूर जिल्ह्याला १ लाख लसीचे डोस पुरविण्यात येतात तेव्हा त्यांचेकडून फक्त १० हजार डोस सिंधुदुर्ग जिल्ह्याला वितरीत केले जातात. त्यामुळे सिंधुदुर्गातील लसीकरण मोहीम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला १ मे २०२१ पासून शासन निर्णयानुसार एकूण ७.५० लाख लसीच्या डोसची आवश्यकता असणार आहे. तरी सदर लसीकरणकामी जिल्ह्याला २ लाखाच्या टप्यामध्ये लस उपलब्ध करून देण्यात यावी, जेणेकरून जास्तीत जास्त व्यक्तींना लस मिळून लसीकरण मोहीम वेगाने राबविली जाईल व जनतेचे आरोग्य सुरक्षित राखता येईल. अशा सूचना नितेश राणे यांनी निवेदनातून दिल्या आहेत.
हेही वाचा- '18 ते 44 वयोगटातील सर्वांना लस मिळावी, हा राज्य शासनाचा प्रयत्न'