सिंधुदुर्ग - या सरकारची मनोवृत्तीच असुरक्षित आहे. असुरक्षित मनोवृत्तीमध्येच हे सरकार काम करत आहे. त्यामुळेच या सरकारने भाजपा आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांची सुरक्षा कमी केली आहे, अशी टीका भाजपाचे आमदार आशिष शेलार यांंनी केली आहे. तसेच मुंबईचे विभाजन करण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना शिवसेनेची मूक संमती असल्याचा घणाघाती आरोपही भाजपा शेलार यांनी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असता, आमदार शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
असुरक्षित मनोवृत्तीत सरकार काम करतेय-
पोलिसांनी जनतेची सुरक्षा करावी, हे अपेक्षित आहे आणि या भूमिकेतून जर राज्य सरकारचा निर्णय असेल तर त्यावर टीका उगाच करावी, अशी आमची इच्छा नाही. मात्र ज्या पद्धतीने त्या यादीमधे भाजपच्या आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांची सुरक्षा काढण्याचा जो निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, त्याचे वर्णन करायचे तर असुरक्षित मनोवृत्तीच्या सरकारने घेतलेला हा निर्णय आहे. या सरकारची मनोवृत्तीच असुरक्षित आहे. असुरक्षित मनोवृत्तीत सरकार काम करतय आणि त्यामुळे अजून एक चुकीचा निर्णय कोणताही वैज्ञानिक किंवा अभ्यासाच्या दृष्टीकोणातून न घेता राजकीय दृष्टीकोणातून घेतलेला हा निर्णय असल्याची टीका भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.
मुंबईला विभाजित करण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना शिवसेनेची मूक संमती
मुंबई महानगरपालिकेसाठी दोन आयुक्त असावे, अशी मागणी शिवसेनेसोबत सत्तेत बसलेल्या काँग्रेसच्या मंत्र्याने म्हणजेच मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केलीय. मुंबईला विभाजित करण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना शिवसेनेची मुक संमती आहे, असा आमचा आरोप असल्याचा थेट हल्ला आशिष शेलार यांनी शिवसेनेवर केलाय. जर शिवसेनेची भुमिका ताठर असेल संयुक्त मुंबई, एकसंघ मुंबई अशी असेल तर त्यांनी काँग्रेसला खडेबोल सुनावले पाहिजे. नाहीतर त्यांच्या पेकाटात लाथ घातली पाहीजे. मात्र या दोन्ही गोष्टी न करता केवळ धुळफेक करण्याचे काम शिवसेना करते आहे. परंतु भारतीय जनता पार्टीला मुंबईचे विभाजन, त्रिभाजन या कुठल्याही गोष्टी मान्य नाहीत, अशा पद्धतीने मुंबईचं विभाजन काँग्रेस आणि मुकसंमती दिलेल्या शिवसेनेचा मुंबई तोडण्याचा प्रयत्न असेल तर जनता स्वीकारणार नाही. भाजप या दोघांच्या विरोधात आंदोलन करेल, असा इशारा आशिष शेलार यांनी दिला आहे.