सिंधुदुर्ग - गोवा शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावी परीक्षांची तारीख जाहीर केली आहे. येत्या 21 मे पासून परीक्षा होणार आहेत. गोव्यातील शाळांमध्ये सिंधुदुर्ग सीमा भागातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून जिल्ह्यात सीमावर्ती भागात परीक्षा केंद्र उभारू असे, आश्वासन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले. भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी याबाबत माहिती दिली.
कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आहे. गोव्यात बाहेरील व्यक्तींना प्रवेश करण्यास मनाई आहे. या परिस्थितीत हे विद्यार्थी परीक्षा कसे देणार? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील दहावी व बारावीच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. मात्र, शुक्रवारी गोवा शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले. सिंधुदुर्गातील एक हजारपेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी दहावी आणि बारावीत शिक्षण घेत आहेत.
गोव्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक, औद्योगीक संस्थामंध्ये सिंधुदुर्ग जिह्यातील बांदा, मडुरा, नेतर्डे, डिंगणे, सातार्डा, सातेसे, कवठणी, साटेली, आरोस, शेर्ले, वाफोली, डेगवे, दोडामार्ग, मणेरी, भेडशी, सासोली, किनळे, आरोंदा, रेडी आदी सीमाभागातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मुख्य म्हणजे या विद्यार्थ्यांची येण्या-जाण्याची व्यवस्था गोवा शासनाकडून विनामूल्य होते. गोव्याचे आकर्षण म्हणून अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी जातात. काही शाळांमध्ये पटसंख्या पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवास खर्च, लॅपटॉप आदी आमिषे दाखवून आपल्या शाळेत प्रवेश दिला होता.
दरम्यान, गोव्यात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता सिंधुदुर्ग जिह्याच्या सीमाभागातील काही शाळांना आगामी काळात कुलुप लागणार आहे. त्याबाबत काही दिवसापूर्वी संस्थाचालकांनी शिक्षणमंत्र्यांना निवेदन देत शाळा वाचण्यासाठी प्रयत्न करा, असे पत्र दिले होते. आता गोव्यात परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आणि या विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर टांगती तलवार आहे. याबाबत राजन तेली यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याशी बोलून सध्या तरी हा प्रश्न मिटवला आहे.