सिंधुदुर्ग - पत्रकार परिषदांमधून बालिश बडबड करण्यापेक्षा आमचे हे आव्हान स्वीकारा आणि शिवसेनेच्या इथल्या आमदार-खासदारांच्या राजीनाम्याचा एकदा काय तो मुहूर्त ठरवा. आमचे आमदार नितेश राणे मैदानात उतरायला कधीही सज्जच असतील. भाजपाच्या जीवावर बांडगुळासारखे उगवलेल्या शिवसेना खासदार आणि दोन्ही आमदारांना जिल्ह्यातून हद्दपार करू, असे प्रतिआव्हान भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिले.
खासदार नारायण राणेंना आव्हान देण्याची स्वतःची खरोखरच योग्यता आहे की नाही, हे शिवसेनावासी झालेल्या सतीश सावंत आणि संजय पडते यांनी एकदा स्वतःच्या अंतरात्म्याला विचारून पहावे. बहुधा उद्धवसेनेत जाताना स्वतःचा अंतरात्मा विकूनच तिथे प्रवेश मिळत असावा, त्यामुळे आता त्यावर बोलण्यात काहीच अर्थ नाही. आमदार नितेश राणे यांच्या राजीनाम्याने राणेंच्या हद्दपारीची तुम्हाला एवढी घाई का? अशी भ्याड आणि भेकड मागणी करण्यापेक्षा एकदा मर्दासारखे मैदानात उतरा. नीतेश राणे तुमच्या पक्षप्रमुखांच्या नाकावर टिच्चून कणकवलीतुन निवडून आले आहेत हे विसरू नका. या जिल्ह्यातील तुमच्या दोन्ही आमदारांच्या एकत्र मताधिक्यापेक्षाही अधिक मताधिक्य घेऊन त्यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. तुमचे आव्हान आम्ही कधीही स्वीकारून नीतेश राणेंना राजीनामा द्यायला सांगून त्यांना पुन्हा मैदानात उतरु. पण भाजपाच्या जीवावर बांडगुळासारखे उगवलेले तुमचे खासदार आणि दोन्ही आमदार यांनीही राजीनामा देऊन पुन्हा एकदा त्यांच्या बरोबरीने निवडणूक लढवण्याची हिंमत दाखवावी. चारही निवडणूका लढवायचे एकदा काय ते होऊनच जाऊदे. असेही राजन तेली म्हणाले.
वैभव नाईकांची कार्यक्षमता कुठे हरवली?
तुमचे आमदार आणि दोन्ही जिल्हाप्रमुख वैभव नाईक आणि संजय पडते जर एवढे कार्यसम्राट होते, तर मालवण पंचायत समिती, कुडाळ पंचायत समिती, कुडाळ नगर पंचायत का टिकवू शकले नाहीत? मालवण नगर परिषदेमध्ये भाजपशी युती नसती तर सत्ता आली असती का याचाही प्रामाणिक विचार करावा. नगरपंचायत कुडाळमध्ये वैभव नाईकांची कार्यक्षमता कुठे हरवली? अगदी कालपरवा भाजपाने सावंतवाडी नगरपरिषद, बांदा सरपंच आणि याच सतीश सावंतांचा मतदारसंघ असलेली आंब्रड जिल्हा परिषद राणे साहेबानी तुम्हाला धुळ चारूनच भाजपाकडे आणली हे ही इतक्या लवकर विसरलात? भविष्यात कोण कोणाची हद्दपारी करणार हे या निकालावरून ठरवा. आज सिंधुदुर्गातील बहुसंख्य ग्रामपंचायती ते जिल्हा परिषद ही सत्तास्थाने राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजपाकडेच आहेत. युतीच्या कृपेवर निवडून आलेले आमदार खासदार म्हणजे शिवसेनेची ताकद नव्हे. ही तीन पदे मिरवत आव्हानबाजी करणाऱ्या तुमची अवस्था म्हणजे डोक्याला मुकुट आणि खाली नागडा असलेल्या राजासारखी दयनीय आहे. अंगातली खुमखुमी जिरवायची एवढीच हौस असेल तर या नागड्या राजांना आता घोड्यावर बसून युद्धमैदानात उतरवा, आणि हौस फिटवून घ्या एकदाची!! खूप झाली राणेंना आव्हानांची भाषा, आता एकदाच काय ती मर्दानगी दाखवून निवडणुकीच्या रणमैदानात उतरून तर दाखवा, हद्दपारी काय असते ते आम्ही तुम्हाला हद्दपार करूनच दाखवून देऊ, असा आरपारचा इशारा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी शिवसेनेच्या सतीश सावंत आणि संजय पडते या जोडगोळीला दिला आहे.