सिंधुदुर्ग - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आज (शुक्रवार) रात्री कणकवलीत दाखल होत आहे. या पार्श्वभूमीवर नरडवे फाट्यावरील शिवसेना शाखेवर शिवसैनिकांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे 'शाब्बास रे माझ्या वाघांनो' आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे 'दिल्लीचेही तख्त हलवितो महाराष्ट्र माझा' या आशयाचे बॅनर लावून राणेंवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
कणकवलीत बॅनर वॉर -
केंद्रीय मंत्री नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा आज सिंधुदुर्गात दाखल होत आहे. दरम्यान, कणकवली शहरात शिवसेना विरुद्ध नारायण राणे असे बॅनरवॉर बघावयास मिळत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणेंना मंत्रिपद मिळाल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी 'दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा' अशा आशयाचे बॅनर लावून राणेंचे अभिनंदन केले होते. सिंधुदुर्गात येत असलेल्या जनआशीर्वाद यात्रेच्या स्वागताचे भाजपा कार्यकर्त्यांनी त्याच आशयाचे बॅनर लावले आहेत. तर शिवसैनिकांनी ही शिवसेना शाखेवर बॅनर लावले आहे. यामुळे कणकवलीत बॅनर वॉर पाहायला मिळत आहे.
कणकवलीत राणेंचे आज आगमन -
मुख्यमंत्री ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राणेंना जनआशीर्वाद यात्रा सुरू असतानाच अटक झाली होती. त्यामुळे राणेंची यात्रा दोन दिवस पुढे ढकलण्यात आली. राणेंना झालेली अटक आणि सुटका यानंतर राणेंचे आज कणकवलीत आगमन होत आहे. यावेळी शिवसैनिकांनी बाळासाहेबांचे 'शाब्बास रे माझ्या वाघांनो' आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे 'दिल्लीचेही तख्त हलवितो महाराष्ट्र माझा' या आशयाचे बॅनर लावले आहेत. त्यामुळे कणकवली शहरात नारायण राणे आणि शिवसेनेत बॅनर वॉर सुरू आहे अशा चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा - मुख्यमंत्री आणि फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा; तर्कवितर्कांना उधाण