सिंधुदुर्ग- बहुरूपी समाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेला आहे. चतुर्थीच्या सुरुवातीला घाटमाथ्यावरून अनेक बहुरूपी कोकणात येतात. इथे भजन-कीर्तन करून आपला उदरनिर्वाह करतात. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. त्यामुळे परतीच्या प्रवासाचे दिवस आले असताना त्यांना घरी जाताही येत नाही आणि फिरून आपल्या पोटासाठी काहीतरी मिळवताही येईना अशी स्थिती होऊन बसली आहे.
कणकवली येथील माळावर पाल ठोकून बहुरूपी समाजाचे एक कुटुंब राहत आहे. शिवाजी अय्यप्पा गणाचारी हे पत्नी आणि चार मुलांसोबत गणेश चतुर्थीनंतर सिंधुदुर्गात येतात. गावोगावचा दौरा करून भजन-कीर्तन करून मिळालेल्या पैशात ते आपलं कुटुंब सांभाळतात.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातील पिंपळ गावचे हे शिवाजी अय्यप्पा गणाचारी सांगतात आता आमचा फिरतीची हंगाम संपला होता. आता आम्ही गावाकडे जायला निघालो असतानाच कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु झाले आणि आम्ही येथेच अडकून पडलो आहोत. आताच तर आमच्याकडचे खाण्याचे सामानही संपले आहे. शिवाय गावात फिरून भजन करून काही पैसे जमवता येत नाहीत. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली असून आम्हला घरी जाऊ दिल्यास उपकार होतील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
शिवाजी अय्यप्पा गणाचारी यांच्यासारखी हातावर पॉट असलेली अनेक माणसे सध्या जिल्ह्यात अडकलेली आहेत. विशेष म्हणजे अशा बऱ्याच लोकांपर्यंत शासनाची व्यवस्था पोचलेली नाही. या लोकांना लॉकडाऊन कधी उठते याची प्रतीक्षा आहे.