सिंधुदुर्ग - जिल्ह्याच्या राजकीय पटलावर गाजत असलेल्या कोविड लॅबच्या मंजुरीचा अध्यादेश अखेर शासनाने काढला आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ठिकाणी रेण्वीय विधान प्रयोगशाळा कोविड-19 आजाराचे निदान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्याकडून शासन अध्यादेश जारी करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये माकडतापाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर माकडतापामुळे अनेक लोकांचे बळी गेले. त्यामुळे माकडतापाचे नमुने तपासणीसाठी लॅब हवी, अशी मागणी होती. त्याप्रमाणे जिल्ह्यात लॅब मंजूरही झाली होती. यासाठी 8.5 कोटीचा निधीही उपलब्ध झाला होता. परंतु, या लॅबचे काम पूर्णत्वास गेले नाही. त्यानंतर आता कोरोनासारखा महाभयंकर विषाणू जगभर पसरल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्याचा शिरकाव होताच सुरुवातीच्या काळामध्ये त्याचा प्रादुर्भाव कमी असला, तरी आता जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. मात्र, कोरोना नमुना तपासणीची प्रयोगशाळा सिंधुदुर्गमध्ये नसल्याने कोल्हापूरमध्ये नमुने तपासणीसाठी पाठवावे लागतात. त्याचा अहवाल येण्यास दोन ते चार दिवस लागत असल्याने जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला होता.
शासन अध्यादेशामध्ये म्हटले आहे की, रेण्वीय निदान प्रयोगशाळा सिंधुदुर्ग येथे आरटीपीसीआर तपासणीसाठी मान्यता देण्यात येत आहे. तसेच रेण्वीय निदान प्रयोगशाळा सिंधुदुर्गसाठी हाफकिन संस्थेकडे यापूर्वी दिलेल्या पुरवठा आदेशानुसार ज्या उपकरणांचा पुरवठा अद्याप झालेला नाही, त्या उपकरणांचा मर्यादित पुरवठा आदेश रद्द करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
आरटीपीसीआर तपासणीसाठी प्रस्तावानुसार आवश्यक उपकरणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन समितीस विहित अटी व शर्थीनुसार 18 मार्च 2020 च्या पुरवठा आदेशानुसार व जिल्हा नियोजन समितीने मान्य केलेल्या निधीतून खरेदी करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 22 मार्च 2018 नुसार रेण्वीय निदान प्रयोगशाळा यांना विहित स्तरावरून पद भरती करण्यास मान्यता देण्यात येत आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आता लवकरच कोविड लॅब सुरू होणार, हे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, कोविड लॅब झाल्यास भविष्यात इतर वेगवेगळ्या आजारांची नमुना तपासणीही याठिकाणी होणार असल्याचेही आरोग्य खात्याकडून सांगण्यात आले आहे.